माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 09:27 IST2026-01-02T09:26:58+5:302026-01-02T09:27:18+5:30
कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमाचा एन्काउंटर झाल्यानंतर नक्षली संघटनांमध्ये मोठी फूट पडल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
गडचिरोली: नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढाईत सुरक्षा दलांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील नक्षली चळवळीचा कणा मानला जाणारा आणि दरभा डिव्हिजनल कमिटीचा सचिव बारसे देवा उर्फ सुक्का याने तेलंगणा पोलिसांसमोर १ जानेवारीला रात्री आत्मसमर्पण केले आहे. देवावर तब्बल ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमाचा एन्काउंटर झाल्यानंतर नक्षली संघटनांमध्ये मोठी फूट पडल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांनी जहाल कमांडर म्हणून माडवी हिडमा याचा खात्मा केला होता. तेव्हापासूनच बारसे देवा दहशतीखाली होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिडमाच्या मृत्यूमुळे नक्षली गटात कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे. केंद्र सरकारचे 'ऑपरेशन कगार' आणि पोलिसांचा वाढता दबाव यामुळे अखेर बारसे देवाने मध्यस्थांमार्फत चार राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधला आणि तेलंगणातील कोठगुडेम जिल्हा पोलिसांसमोर शरणागती पत्करली.
'सीआरपीएफ'वरील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड
बारसे देवा हा मूळचा छत्तीसगडच्या पुर्वर्थी गावचा रहिवासी आहे. पीएलजीए (PLGA) च्या पहिल्या बटालियनचा कमांडर म्हणून त्याने अनेक वर्ष काम केले. छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या अनेक प्राणघातक हल्ल्यांमध्ये त्याचा थेट सहभाग होता. हिडमा सेंट्रल कमिटीत गेल्यानंतर त्याच्या सर्व जबाबदाऱ्या देवाने सांभाळल्या होत्या. त्याच्या आत्मसमर्पणानंतर नक्षली चळवळीची मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.