पावसामुळे झोपडीच्या आश्रयाला धावला अन् जीव गमावला; वीज कोसळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 17:18 IST2023-07-19T17:18:03+5:302023-07-19T17:18:37+5:30

कुटुंबाचा आधार गेला: मेहुणा जखमी, खांदाळी शिवारातील घटना

man ran to the shelter of a hut due to the rain and lost his life; death due to lightning | पावसामुळे झोपडीच्या आश्रयाला धावला अन् जीव गमावला; वीज कोसळून मृत्यू

पावसामुळे झोपडीच्या आश्रयाला धावला अन् जीव गमावला; वीज कोसळून मृत्यू

घनश्याम म्हशाखेत्री/ धानोरा : आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले होते. दुपारी साडेतीन वाजताच सायंकाळसारखा अंधार पसरलेला होता. हे भेसूर चित्र काहीतरी संकट घेऊन येत आहे, याची जणू ही चाहूलच होती. याच वेळी पावसापासून वाचण्यासाठी एक तरुण मेहुण्यासह झोपडीकडे धावला व त्याच्या अंगावर वीज कोसळली, यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मेहुणा जखमी झाला आहे. ही घटना खांदाळी शिवारात १८ जून रोजी घडली.

संजय देवशा उसेंडी (२८, रा.पवनी धानोरा) असे मयताचे नाव आहे. उत्तम हिरामण पदा (२५,रा.सालेभट्टी) हा जखमी आहे. १७ रोजी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाला. १८ रोजी दुपारी अचानक ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट झाला. यावेळी संजय उसेंडी हा मेहुणा उत्तम पदासोबत शेतात होता. पाऊस सुरू झाल्यावर गुरे घेऊन तो झोपडीकडे धावला. यावेळी वीज कोसळली व त्याचा करुण अंत झाला, त्याचा मेहुणा उत्तम पदा हा जखमी असून, त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती तलाठी व पोलिसांनी भेट दिली. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांकडे सोपविले.

नातेवाईक शोकमग्न

संजय उसेंडी याच्यामागे आई-वडील, पत्नी, चार मुली व एक मुलगा असा परिवार आहे. अचानक वीज कोसळून मृत्यू झाल्याने परिवाराचा आधार हरवला आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून, रुग्णालयात शोकमग्न कुटुंबीयांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थितांचे हृदय हेलावून गेले.

Web Title: man ran to the shelter of a hut due to the rain and lost his life; death due to lightning