चामोर्शी पं.स.वर पुन्हा महिलाराज

By Admin | Updated: September 9, 2014 00:22 IST2014-09-09T00:22:39+5:302014-09-09T00:22:39+5:30

चामोर्शी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीची निवडणूक रविवारी होत आहे. सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने पुन्हा महिला राज्य पं.स.वर येणार आहे.

Mahilaraj again at Chamorshi Pt | चामोर्शी पं.स.वर पुन्हा महिलाराज

चामोर्शी पं.स.वर पुन्हा महिलाराज

चामोर्शी : चामोर्शी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीची निवडणूक रविवारी होत आहे. सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने पुन्हा महिला राज्य पं.स.वर येणार आहे. महिला सदस्य व त्यांचे यजमान आपआपली शक्ती अजमावून मोर्चेबांधणीला लागले आहेत. सध्या या पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. १८ सदस्यांपैकी ९ सदस्य भाजपचे असून युवाशक्तीच्या दोन सदस्यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्याकडे निर्विवाद बहूमत झाले आहे. शिवाय दोन अपक्षांचाही भाजपला पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, काँग्रेस दोन सदस्य आहेत. त्या बळावर सत्ता स्थापनेसाठी त्यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपचे काही सदस्य आपल्या खेम्यात आणून गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न आहे. भाजपकडे विद्यमान सभापती वर्षा भांडेकर यांच्यासह शशीकला चिडंगे, मनीषा दुधबावरे, मिनाक्षी देवगडे, रंजना कुमरे, मंदा दुधबावरे अशा सहा व अपक्ष सावित्री घरामी युवाशक्तीकडून भाजपवासी झालेल्या कल्पना कोडापे या ८ सदस्य सभापती पदाच्या खुर्चीची आस लावून आहेत. यापूर्वी सभापती पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होते. त्यावेळी केशव भांडेकर व वर्षा भांडेकर हे दोन प्रबळ दावेदार होते. सव्वासव्वा वर्ष दोघांनाही सभापती पद दिले जाईल, असा फॉर्म्युला ठरविण्यात आला होता. मात्र वर्षा भांडेकर सव्वा वर्षांनी सभापती पदावर कायमच राहिल्या. त्यामुळे केशव भांडेकर यांचा पत्ता साफ झाला. उपसभापतिपदी मनमोहन बंडावार विराजमान होते. वर्षा भांडेकर पुन्हा सभापती पदासाठी इच्छुक नाहीत, असे राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे यांच्या गोट्यातील सदस्य मनीषा दुधबावरे व माजी पं.स. उपसभापती बंडू चिळंगे यांच्या पत्नी शशिकला चिळंगे या सभापती पदाच्या प्रबळ दावेदार आहेत. तर उपसभापती पदासाठी विद्यमान उपसभापती मनमोहन बंडावार, केशव भांडेकर, रेवनाथ कुसराम दंड थोपटून आहेत. केशव भांडेकरांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Mahilaraj again at Chamorshi Pt