राब जाळण्यातून जंगलाची हाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:01:12+5:30
नवीन रोपवन प्रक्रिया राबविण्यापूर्वी जुने जंगल निष्काषित करून राब जाळण्याच्या कार्यवाहीदरम्यान मौल्यवान लाकडे जळून खाक होतात. या प्रक्रियेमुळे आरमोरी तालुक्यातील अनेक ठिकाणचे जुने जंगल नष्ट होत आहे. गडचिरोली जिल्हा हा वनांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात ७६ टक्के जंगल असून मौल्यवान सागवान आहे.

राब जाळण्यातून जंगलाची हाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. यातील बरेचशे जंगल वनविभागाकडे तर काही जंगल वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. नवीन रोपवन प्रक्रिया राबविण्यापूर्वी जुने जंगल निष्काषित करून राब जाळण्याच्या कार्यवाहीदरम्यान मौल्यवान लाकडे जळून खाक होतात. या प्रक्रियेमुळे आरमोरी तालुक्यातील अनेक ठिकाणचे जुने जंगल नष्ट होत आहे.
गडचिरोली जिल्हा हा वनांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात ७६ टक्के जंगल असून मौल्यवान सागवान आहे. गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ट सागवानाला राज्यभरात मोठी मागणी आहे. मात्र वनविभाग व एफडीसीएमच्या नियोजनशून्य कारभारामुळे जंगलाचे क्षेत्र कमी होताना दिसून येत आहे. आरमोरी तालुक्यातील सालमारा बिटात वनविकास महामंडळाच्या वतीने पोेर्ला वनपरिक्षेत्राअंतर्गत जंगल निष्कासनाचे काम करण्यात आले. नवीन रोपवन प्रक्रिया करण्यापूर्वी राब जाळण्याच्या कामात झाडाच्या टाकाऊ फांद्या काडीकचऱ्यासोबत वाहतूक करताना जागेवरच राहिलेले इमारतीसाठी उपयुक्त मौल्यवान लाकडे सर्रास जाळली जातात. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतो.
पोर्ला एफडीसीएम परिक्षेत्राअंतर्गत सालमारा बिटातील कक्ष क्र.३७ मध्ये ३० हेक्टर आर जागेत जंगलात निष्कासनाचे काम करण्यात आले. यातील काही काम मजुरांमार्फत तर अर्ध्यापेक्षा अधिक काम कर्वत यंत्राच्या सहाय्याने करण्यात आले. सदर काम ठेका पद्धतीने करण्यात आले. खुटाजवळील जागेवरील बिजा, येन या मौल्यवान प्रजातीचे इमारती लठ्ठे व बिट उचलताना ट्रॅक्टरधारकांना अडचण निर्माण झाली. त्यानंतर किमती माल जागेवरच राहिल्याचे दिसून आले. निष्कासनाचे काम झाल्यानंतर रोपवन लागवडीपूर्वी संपूर्ण ३० हेक्टर क्षेत्रावरील काडीकचरा राब जाळून स्वच्छ करावा लागतो. पावसापूर्वी रोपवन क्षेत्र तयार करण्यासाठी इमारती लठ्ठे व जळाऊ बिट जाळले जाते.
कक्ष क्रमांक ३७ चे वनरक्षक मडावी यांना कालच सूचना दिली होती. राब जलाई बंद करून सर्वप्रथम संपूर्ण लाकडी माल कुपाच्या बाहेर काढावे. पुन्हा आज हीच सूचना दिली आहे.
- के.एन.यादव, वनपरिक्षेत्राधिकारी
(एफडीसीएम), पोर्ला
कर्मचाऱ्यांवरच जबाबदारी
मुख्य डेपोवर लाकडी लठ्ठ्याची वाहतूक केल्यानंतर जळाऊ बिटामध्ये घट येऊ नये, यासाठी मजुराच्या मोजमापात अधिकचा माल घेऊन शोषण केले जाते. संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी स्वत: जंगल निष्कासन क्षेत्रात फारसे फिरकून पाहात नाही. परिणामी वनपाल व वनरक्षक आपल्या मनमर्जीने ही कामे करीत असतात. सरपणासाठी लाकडे तोडली तर सर्वसामान्यांवर कारवाई केली जाते. मात्र वनकर्मचाºयाला अभय दिले जाते.