Lockdown reduces serious crime by 23% | लॉकडाऊनमध्ये गंभीर गुन्ह्यात २३ टक्के घट

लॉकडाऊनमध्ये गंभीर गुन्ह्यात २३ टक्के घट

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत कमतरता : घरी राहत असल्याचा परिणाम; मार्च व एप्रिल महिन्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनामुळे मार्चच्या शेवटी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. गेल्यावर्षी याच काळातील गुन्ह्यांची तुलना केल्यास गंभीर गुन्हे २३ टक्क्यांनी घटल्याचे पोलीस विभागाने घेतलेल्या नोंदीवरून दिसून येते. असे असले तरी पोलिसांवरचा ताण मात्र कायम असून त्यांना विविध पातळ्यांवर ड्युटी करावी लागत आहे.
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनच्या कालावधीत देशभरातील व्यापार, उद्योग, कारखाने, दुकाने, बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, वाहतुकीची साधने बंद होती. अत्यावश्यक काम वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यासही प्रतिबंध घालण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे देशाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असले तरी त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे, गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांचे प्रमाण घटले असल्याचे दिसून येते. खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी आदी गुन्हे गंभीर स्वरूपाचे मानले जातात. मार्च २०१९ मध्ये अशा प्रकारचे ३४ तर एप्रिल २०१९ मध्ये १८ असे एकूण ५२ गुन्हे घडले होते. मार्च २०२० मध्ये १८ तर एप्रिलमध्ये २४ गुन्हे असे एकूण ४२ गुन्हे घडले आहेत. मागील वर्षीच्या मार्च व एप्रिल महिन्यामधील गुन्ह्यांची या वर्षातील याच महिन्यांतील गुन्ह्यांशी तुलना केली असता, गुन्ह्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले असल्याचे दिसून येते. मार्च व एप्रिल २०२० मध्ये खुनाचे चार गुन्हे, खुनाच्या प्रयत्नाचे सात गुन्हे, बलात्काराचे सात गुन्हे, घरफोडी सहा, तर चोरीचे १८ गुन्हे घडल्याची नोंद पोलीस विभागाकडे आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश नागरिक घरीच राहात होते. तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यात व्यस्त राहात होते. त्याचबरोबर घराबाहेर पडल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असल्याने नागरिक सहजासहजी घराबाहेर पडत नव्हते.
उन्हाळ्याच्या कालावधीत मुलांना सुट्या राहात असल्याने काही नागरिक फिरण्यासाठी जातात. या संधीचा गैरफायदा उचलून उन्हाळ्यामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होते. यावर्षी मात्र नागरिक घरीच असल्याने घरफोडीच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येते.

विनयभंग, दारूबंदीच्या कारवाया वाढल्या
इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी असले तरी विनयभंगाच्या घटनांमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ झाली असल्याचे दिसून येते. यावर्षी विनयभंगाच्या मार्चमध्ये १० तर एप्रिलमध्ये ७ अशा एकूण १७ घटना घडल्या. तर मागील वर्षी मार्चमध्ये विनयभंगाच्या ३ आणि एप्रिलमध्ये केवळ एकच घटना घडली होती.
गेल्यावर्षी मुंबई दारूबंदी कायद्यान्वये मार्च महिन्यात १३४ तर एप्रिल महिन्यात ८६ गुन्हे दाखल करण्यात आले. यावर्षी लॉकडाऊनच्या काळात दारूबंदीच्या कारवाया वाढल्या. मार्च महिन्यात १५१ तर एप्रिल महिन्यात दारूबंदीच्या १६७ कारवाया करून गुन्हे नोंदविण्यात आले.

गेल्यावर्षी मे महिन्यात ११४ गुन्हे दाखल
मागील वर्षी मे महिन्यात खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, घरफोडी, चोरी, विश्वासघात, ठकबाजी, दुखापत, विनयभंग, हयगयीच्या कृत्याने मृत्यू आदी घटनासंदर्भात ११४ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ७८ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आले. जुगार प्रतिबंधक कायदा, मुंबई दारूबंदी कायदा व इतर भादंवि अन्वये १० गुन्हे असे एकूण ७७ गुन्हे दाखल केले. यावर्षी संपूर्ण मे महिनाभर लॉकडाऊन सुरू होते. त्यामुळे नागरिकांच्या फिरण्यावर काही प्रमाणात प्रतिबंध होता. मे महिन्याचा गोषवारा पोलीस विभागाकडे उपलब्ध झाला नसला तरी मे महिन्यातील गुन्ह्यांमध्येही यावर्षी मोठी घट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Lockdown reduces serious crime by 23%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.