देसाईगंजात फिरत्या वाहन लोक अदालतीचा शुभारंभ
By Admin | Updated: April 2, 2017 01:44 IST2017-04-02T01:44:35+5:302017-04-02T01:44:35+5:30
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या फिरते वाहन लोक अदालत योजनेंतर्गत

देसाईगंजात फिरत्या वाहन लोक अदालतीचा शुभारंभ
यू. एम. पदवाड यांचे प्रतिपादन : गावातच न्यायनिवाडा होत असल्याने पक्षकारांच्या वेळ व पैशाची बचत
देसाईगंज : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या फिरते वाहन लोक अदालत योजनेंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने देसाईगंज येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी फिरते वाहन लोकअदालतीचा शुभारंभ करण्यात आला.
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यू. एम. पदवाड यांनी हिरवी झेंडी दाखवून या लोकअदालतीचा शुभारंभ केला. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे सचिव न्यायाधिश ता. के. जगदाडे, देसाईगंजचे न्यायाधिश के. आर. सिंघेल, फिरते वाहन लोक न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हशाखेत्री, तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष एन. डी. वारजुरकर, वरिष्ठ अधिवक्ता व्ही. पी. ढोरे, अॅड. एस. एस. गुरू, अधिवक्ता सौदागर, पिल्लारे, उईके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात हमको मन की शक्ती देना या प्रेरणा गीताने झाली. यावेळी न्यायाधिश पदवाड म्हणाले, फिरत्या लोकअदालत योजनेमुळे गाव तिथे न्याय मिळू लागला आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वसामान्य लोकांना त्यांच्याच गावात न्याय देणे सुलभ झाले आहे. फिरत्या लोक अदालतीमुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यायाधिश के. आर. सिंघेल, संचालन वरिष्ठ अधिवक्ता एस. एस. गुरू यांनी केले. यशस्वीतेसाठी न्यायालयाचे सहायक अधीक्षक देशमुख, देवईकर, लघु लेखक मून, वरिष्ठ लिपीक टारपे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)