व्याज सवलत योजनेत लाखोंचा अपहार, जिल्हा उपनिबंधकांना कारणे दाखवा नोटीस
By संजय तिपाले | Updated: June 4, 2025 15:54 IST2025-06-04T15:54:03+5:302025-06-04T15:54:57+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचा दणका : कार्यालयीन खात्यातून नातेवाईकांच्या नावे वळविले पैसे

Lakhs of rupees embezzled in interest subsidy scheme, show cause notice issued to district deputy registrars
संजय तिपाले
गडचिरोली: आदिवासी विविध कार्यकारी संस्था, सेवा सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी आदिवासी उपयोजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या निधीची रक्कम नातेवाईकाच्या खात्यात वळती करुन लाखोंचा अपहार केल्याची बाब समोर आली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी याची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक विक्रम सहारे यांना ३ जून रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात भाजप सहकारी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे व शिंदेसेनेचे आरमोरी विधानसभा संघटक नारायण धकाते यांनी पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल मागवला. यात जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयीन बँकेच्या खात्यातून पहिल्यांदा ६ लाख व नंतर ४ लाख रुपये स्वत:च्या नातेवाईकाच्या खात्यात वळविल्याचे निष्पन्न झाले. रोखवहीत देखील अनियमितता आढळून आली. या पार्श्वभूमीवर कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण नसल्याचा ठपका ठेऊन जिल्हा उपनिबंधक विक्रम सहारे यांना जिल्हाधिकारी पंडा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. तीन दिवसांत याबाबत स्पष्टीकरण सादर करावे, असे बजावले असून खुलासा न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
"या प्रकरणाशी माझा थेट संबंध नाही. माझी स्वाक्षरी स्कॅन करुन हा निधी वळविला आहे. याबाबत लेखापाल हेमंत जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे. फौजदारी कारवाई प्रस्तावित केली असून सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांना याचा सविस्तर अहवाल दिला आहे."
- विक्रम सहारे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोली