आरमोरी येथील श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये गडचिरोली येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत आखाडे यांचा कोविड योद्धा म्हणून शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन रविवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर साळवे होते, प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामन ठवकर, संजय कापकर, प्राचार्य नेहा ओलाख, लोकमत प्रतिनिधी महेंद्र रामटेके आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. प्रशांत आखाडे यांनी कोविड काळात रत्नागिरी आणि गडचिरोली येथे केलेल्या सेवेतील अनेक आठवणींना उजाळा देत रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. जी. एन. एम आणि ए. एन. एम. ह्या आरोग्याचा खरा कणा असून कोविड काळात डॉक्टर व नर्सेस यांचे महत्त्व प्रकर्षाने समाजासमोर आले. समाजानेसुद्धा नियम पाळून डॉक्टरांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशिक्षिका मनीषा बारापात्रे तर आभार शिल्पा नारनवरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रशिक्षिका चंदा कन्नाके, भूषण ठकार, स्वप्निल धात्रक, केशव सेलोटे यांनी सहकार्य केले.