लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : घरकामावरून वडील रागावल्याचा किरकोळ राग मनात धरुन घराबाहेर पडलेला १७ वर्षांचा मुलगा नंतर हाती शस्त्र घेऊन हिंसेच्या मार्गावर गेला, तो १४ वर्षांपासून पुन्हा परतलाच नाही. पोलिसांच्या अभिलेख्यावर शिल्लक असलेल्या शेवटच्या सहा माओवाद्यांपैकी मूळचा गडचिरोली जिल्ह्यातला एकमेव जयराम उर्फ नंदू मोंगे गावडे हा सध्या सुरक्षा यंत्रणाच्या रडारवर आहे. ३१ मार्च रोजी डाव्या पक्षाच्या नेत्यांनी त्याच्या घरी भेट दिली. यावेळी वडील मोंगे गावडे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या मुलाला भावनिक साद घातली.
एटापल्लीच्या गिलनगुडा या दुर्गम गावचा रहिवासी असलेल्या जयराम गावडे हा माओवाद्यांच्या कंपनी क्रमांक १० चा सदस्य आहे. वयाच्या १७ व्या वर्षी त्याने माओवादी चळवळीत प्रवेश केला. यासाठीचे कारण खूपच किरकोळ होते. वडिलांनी घरात सांगितलेले काम त्याने ऐकले नाही, त्यामुळे वडील रागावले, एवढ्या छोट्या कारणासाठी तो घरातून निघून गेला अन् माओवाद्यांच्या जाळ्यात अडकला. शस्त्र हाती घेऊन नंतर तो त्या हिंसक चळवळीचा भाग बनला.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी नक्षलसमाप्तीसाठी दिलेली ३१ मार्चची डेडलाईन संपली. आता गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. उरलेल्या सहा माओवाद्यांत चार महिला व विभागीय समिती सदस्य राजू वेको आणि सदस्य जयराम गावडे या दोन पुरुषांचा समावेश आहे. यापैकी पाच जण छत्तीसगड राज्यातील असून एकमेव जयराम गावडे हा गडचिरोलीचा आहे. ३१ मार्च रोजी सायंकाळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव सचिन मोतकुरवार यांनी गिलनगुडा गावात जाऊन त्याचे वडील मोंगे गावडे यांची भेट घेतली.
आपल्या माणसांत परत ये....
पदाधिकाऱ्यांनी जयरामच्या आत्मसमर्पणासाठी आवाहन करण्याची विनंती केली. ती त्यांनी लगेचच मान्य केली व एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या मुलाला भावनिक आवाहन केले. माडिया भाषेतून त्यांनी मुलाला 'आता दलममधील तुझे सर्व मोठे साथीदार आणि नेतेही सोडून गेले आहेत. मग तू एकटाच जंगलात कशासाठी हाल सोसतोय? बंदुकीचा त्याग कर आणि आपल्या माणसांत परत ये,' अशा शब्दांत आर्त साद घातली आहे. संविधानाच्या चौकटीत राहून संघर्ष करावा
यावेळी डाव्या नेत्यांनी स्पष्ट केले की, शंभर वर्षांचा इतिहास असलेले डावे पक्ष आजही जनतेच्या हक्कासाठी संविधानाच्या चौकटीत राहून लढत आहेत. बंदुकीच्या जोरावर सामान्यांना न्याय मिळणे शक्य नाही. रोजगार हमी आणि वनाधिकारासारखे कायदे लोकशाही मार्गाच्या लढाईतूनच मिळाले आहेत. त्यामुळे जयरामसारख्या तरुणांनी मुख्य प्रवाहात येऊन शेकाप, भाकप किंवा माकपच्या झेंड्याखाली जनतेसाठी काम करावे, त्यांचे पक्षात स्वागत करु, असे आवाहन या नेत्यांनी केले.
Web Summary : A Maoist's father appeals to his son, Jayram, to surrender. Driven by a childhood argument, Jayram joined the Maoists at 17. With only six Maoists remaining in Gadchiroli, leaders urge him to return, promising support in fighting for rights constitutionally.
Web Summary : एक माओवादी के पिता जयराम से आत्मसमर्पण करने की अपील करते हैं। बचपन के एक तर्क से प्रेरित होकर, जयराम 17 साल की उम्र में माओवादियों में शामिल हो गया। गढ़चिरौली में केवल छह माओवादियों के शेष रहने पर, नेता उससे लौटने का आग्रह करते हैं, संवैधानिक रूप से अधिकारों के लिए लड़ने में समर्थन का वादा करते हैं।