'गोंडवाना'त गुणवाढीचा प्रकार ? परीक्षा भवनाला सील लावल्यानंतर संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:26 IST2026-02-21T14:21:38+5:302026-02-21T14:26:16+5:30
प्रशासनाकडून प्रचंड गोपनीयता : चंद्रपुरातील विद्यार्थ्यांची कंत्राटी कर्मचाऱ्यांशी सलगी

Irregularities in marks increase in Gondwana? Suspicion after the examination building was sealed.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठातील पुनर्मूल्यांकन विभागाला 'सील' लावण्यात आले आहे. चंद्रपूर शहरातील एका नामांकित महाविद्यालयातील एका विषयाच्या उत्तरपत्रिकेत पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान गुणवाढीचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. दरम्यान, पुनर्मूल्यांकनासाठी प्राप्त झालेला एक पेपर विद्यापीठाच्या परीक्षा भवनातून गहाळ झाल्याची चर्चा विद्यापीठ परिसरात आहे. मात्र, याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून प्रचंड गोपनीयता पाळली जात आहे.
गोंडवाना विद्यापीठात सध्या विविध विषयांच्या पेपर पुनर्मूल्यांकनाचे काम सुरू आहे. १२ फेब्रुवारीला गुणवाढीचा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे परीक्षा विभागाने पुनर्मूल्यांकनाचे काम काही कालावधीसाठी स्थगित केल्याची माहिती आहे.
चंद्रपुरातील एका महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांशी सलगी करून गुणवाढीचा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे विद्यापीठाने या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून हे काम काढून घेतले असून, आता तिथे विद्यापीठातील दोन कायम कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विद्यापीठात बोलावून घेतले आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्याची चर्चाही विद्यापीठाच्या वर्तुळात आहे.
माध्यमांशी बोलणे अधिकाऱ्यांनी टाळले
या प्रकाराबाबत खातरजमा करण्यासाठी 'लोकमत'ने विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याच विभागाचे सहायक कुलसचिव रवींद्र जुनघरी यांच्याशी संपर्क केला असता, परीक्षेपूर्वीचे काम माझ्याकडे असते, मूल्यांकनाबाबत 'संचालक' यांना विचारणा करावी, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वीही घडला होता गुणवाढीचा प्रकार
गोंडवाना विद्यापीठात सात ते आठ वर्षांपूर्वी उत्तरपत्रिका मूल्यांकन प्रक्रियेत गुणवाढीचा प्रकार उजेडात आला होता. त्यावेळी 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली होती.