चामोर्शी तालुक्यात नीलगिरी लागवड क्षेत्रात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST2021-06-07T05:00:00+5:302021-06-07T05:00:29+5:30
नीलगिरी बहुगुणी, बहुउपयोगी आणि जलद वाढणारी झाडे असल्याने एकात्मिक कृषी विकास कार्यक्रमात या झाडाचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय सर्व प्रकारच्या जमिनीत हे झाड वाढत असल्याने सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेत नीलगिरीला महत्त्वपूर्ण स्थान आहे. याच माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवाराच्या परिसरात झाडाची लागवड केली जात आहे.

चामोर्शी तालुक्यात नीलगिरी लागवड क्षेत्रात वाढ
लाेकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : खडकाळ, कोरडवाहू शेतजमिनी तसेच मजगीच्या पाळीवर, शेतातील पाड्यावर निलगिरीचे झाडे लावून त्यातून अधिकाधिक उत्पन्न घेण्याकडे चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. तालुक्याच्या कळमगाव, एकोडी, नवेगाव माल, फोकुर्डी, भेंडाळा, मुरखळा, चाकलपेठ, नागपूर चक आदी परिसरात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नीलगिरीची झाडे लावल्याने त्यांना बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळण्याची आशा आहे.
नीलगिरी बहुगुणी, बहुउपयोगी आणि जलद वाढणारी झाडे असल्याने एकात्मिक कृषी विकास कार्यक्रमात या झाडाचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय सर्व प्रकारच्या जमिनीत हे झाड वाढत असल्याने सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेत नीलगिरीला महत्त्वपूर्ण स्थान आहे. याच माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवाराच्या परिसरात झाडाची लागवड केली जात आहे. नीलगिरीच्या झाडाचा लाकूड-फाटा ही एक सलग वाढत असल्याने इमारतीसाठी उपयोगी पडतो. झाडांना बाजारपेठेत वाजवी दर मिळते. नीलगिरीचे झाड उन्हाळ्यात पूर्णत वाढते म्हणजे नवी पाने येण्यापूर्वी त्यांच्या वजनात एक-तृतीयांश घट येते व ते एक चांगले इंधन म्हणूनही वापरता येते.
नीलगिरीच्या झाडापासून कागद निर्मितीही केली जाते. या झाडाची साल किंवा बुंध्यातून पाझरणाऱ्या स्रावामुळे कातडी कमविण्यास लागणारे टॅनिनसारखे द्रव्य ही मिळते. निलगिरीच्या झाडातील विविध प्रकारचे गुणधर्म व उपयोग लक्षात घेऊन या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर झाडाची चांगली किमत मिळत असल्याने विक्री केली जाते. त्यामुळे सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून नीलगिरी वृक्षाची लागवड करण्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
तालुक्यासह परिसरातील अनेक गावात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नीलगिरीची लागवड केली आहे. गडचिराेली जिल्ह्यात अनेक ठिकाणी नीलगिरीचे झाड शेतशिवारात दिसून येत आहे. नीलगिरीचे लाकूड अतिशय मजबूत असल्याने याला माेठी मागणी आहे. कमी खर्चाची व कमी धाेक्याची ही शेती शेतकऱ्यांना सध्याच्या स्थितीत परवडणारी आहे. नीलगिरी लागवडीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणे गरजेचे आहे. तशी मागणी हाेत आहे.
हे आहेत औषधी गुणधर्म
नीलगिरीच्या झाडाचा औषधी गुणधर्म असलेले कॅलरी पिक मूल्य कमीत कमी चार हजार सातशे ते ४८०० कॅलरीज प्रति किलोग्राम असतात औषध कंपन्या तसेच आयुर्वेदिक कंपन्यांकडूनही झाडांना मोठी मागणी असते. पाने तसेच कोवळ्या फांद्यापासून नीलगिरीचे तेल काढले जाते. याचा वापर औषधी, औद्योगिक व सुगंधी तेल निर्मितीसाठी केला जातो. तसेच नीलगिरीचे लाकूड औद्योगिक उपयोगासाठी व ७० प्रकारचे तेल औषधासाठी वापरले जाते. नीलगिरीच्या तेलात सिनीओल जास्त असल्याने यापासून साबण स्प्रे व औषधी गोळ्याही तयार केले जातात. गडचिराेली जिल्हा हा धान उत्पादकाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी या जिल्ह्यातील शेतकरी आता साेयाबिन, कापूस व नीलगिरी आदी पिकांकडे वळला आहे. या पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शन लाभत आहे.
कोरडवाहू शेतजमिनीत गेल्या सात - आठ वर्षापासून निलगिरी लागवड केली आहे. झाडे उंच झाल्यामुळे इतरही पीक निलगिरी वनशेतीत घेता येते. मात्र स्थानिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध नसल्याने परजिल्हातील व्यापारी येऊन निलगिरीचे लाकूड खरेदी करून नेत असतात. यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संबंधित विभागांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.
- पुरुषोत्तम राऊत, शेतकरी मुरखळा.