गडचिरोलीत १५६ पोलिस अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह
By संजय तिपाले | Updated: April 26, 2023 17:09 IST2023-04-26T17:09:00+5:302023-04-26T17:09:28+5:30
दुर्गम भागातील खडतर सेवेचा सन्मान: अपर अधीक्षकांसह उपअधीक्षक, चार पोलिस निरीक्षकांसह २६ उपनिरीक्षकांचा समावेश

गडचिरोलीत १५६ पोलिस अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह
गडचिरोली : नक्षलप्रभावित जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागात खडतर व प्रशंसनीय सेवा बजावणाऱ्या १५६ पोलिस अधिकारी व अंमलदारांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. गडचिरोली पोलिस दलाची मान यामुळे उंचावली आहे.
पोलिस सेवेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ८०० अधिकारी व अंमलदारांना महासंचालक रजनीश सेठ यांनी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर २६ एप्रिलला सन्मानचिन्ह जाहीर केले. ८०० जणांच्या यादीत एकट्या गडचिरोलीतील १५६ अधिकारी व अंमलदारांनी स्थान मिळवले आहे.
अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, गडचिरोलीचे उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांच्यासह चार पोलिस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक, २६ उपनिरीक्षक व तीन सहायक उपनिरीक्षकांचा यात समावेश आहे. याशिवाय ११ हवालदार, ३१ पोलिस नाईक, ७६ पोलिस शिपाई यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
दरम्यान, हवालदार जगदेव मडावी यांना मरणोत्तर पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांनी स्वागत केले आहे.