'हिडमा' ठार, पण सर्वोच्च नेता 'देवजी' कुठे ? कुटुंबीयाचा पोलिसांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 14:50 IST2025-11-21T14:49:18+5:302025-11-21T14:50:00+5:30
Gadchiroli : आंध्रप्रदेशात सलग दोन दिवस झालेल्या चकमकीत ५०० जवानांच्या हत्येचा मास्टरमाईंड असलेला केंद्रीय समिती सदस्य व पीएलजीए कमांडर माडवी हिडमा याच्यासह १५ नक्षलवादी ठार झाले तर ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले.

'Hidma' killed, but where is the supreme leader 'Devji'? Family makes serious allegations against the police
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आंध्रप्रदेशात सलग दोन दिवस झालेल्या चकमकीत ५०० जवानांच्या हत्येचा मास्टरमाईंड असलेला केंद्रीय समिती सदस्य व पीएलजीए कमांडर माडवी हिडमा याच्यासह १५ नक्षलवादी ठार झाले तर ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले. मात्र, माओवादी चळवळीचा सर्वोच्च नेता थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी याचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. यामुळे देवजी कुठे आहे, हा प्रश्न उपस्थित होत असून कुटुंबीयांनी आंध्र पोलिसांवरच संशय व्यक्त केला आहे.
सलग दोन दिवस झालेल्या चकमकीनंतर देवजी देखील ठार झाल्याच्या अफवा जोरात पसरल्या होत्या. मात्र, आंध्र प्रदेश गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश कुमार लड्डा यांनी हा दावा फेटाळून लावला होता. पोलिसांच्या मते, चकमकीतून पळून गेलेल्या १५ नक्षलवाद्यांपैकी देवजीही असू शकतो आणि तो तेलंगणा-छत्तीसगडच्या सीमेवर लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मात्र, देवजीच्या कुटुंबीयाने वेगळा संशय व्यक्त केला. मंगळवारी देवजीच्या सुरक्षा पथकातील नऊ अंगरक्षकांना आंध्र पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे देवजीही पोलिसांच्या ताब्यात आहे, असा संशय देवजीचा भाऊ गंगाधर थिप्पारी याने व्यक्त केला. जर अटक केली असेल तर कोर्टात का आणत नाहीत? असा थेट सवालही त्याने माध्यमांसमोर उपस्थित केला.
हिडमासह पत्नीवर अंत्यसंस्कार, पोलिसांनी आरोप फेटाळले
- नक्षल कमांडर माडवी हिडमा, पत्नी राजे उर्फ राजक्का आणि इतर चार माओवादी १८ नोव्हेंबरला छत्तीसगड - आंध्रप्रदेश सीमेवर चकमकीत ठार झाले होते.
- हिडमा आत्मसमर्पणासाठी तयार होता, असा आरोप काही संघटनांनी केला; मात्र आंध्र पोलिसांनी हे दावे फेटाळून लावत, असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नव्हता, असे सांगितले.
- गुरुवारी हिडमा आणि त्याची पत्नी राजे उर्फ राजक्कावर पूर्वती या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.