निराधार बहिणींना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:51 IST2018-12-08T00:51:34+5:302018-12-08T00:51:59+5:30
तालुक्यातील जोगीसाखरा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयात शिकणाऱ्या दोन बहिणींवरील मातृ-पितृछत्र हरपल्याने दोन्ही बहिणी पोरक्या झाल्या. या दोघी बहिणींच्या शिक्षणाचा खर्च शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाºयांनी उचलला आहे.

निराधार बहिणींना मदतीचा हात
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील जोगीसाखरा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयात शिकणाऱ्या दोन बहिणींवरील मातृ-पितृछत्र हरपल्याने दोन्ही बहिणी पोरक्या झाल्या. या दोघी बहिणींच्या शिक्षणाचा खर्च शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उचलला आहे.
जोगीसाखरा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयात इयत्ता नववीत शिकणारी वैैष्णवी रमेश मोहुर्ले व इयत्ता आठवीत शिकणारी पूजा रमेश मोहुर्ले या दोघी बहिणी जोगीसाखरा येथील रहिवासी आहेत. दोघींच्या आईवडिलांवर काळाने घाला घालून पोरके केले. सध्या त्या आपल्या आजीआजोबांकडे राहत आहेत. अभ्यासात हुशार असलेल्या बहिणींना शिक्षणाची फार आवड आहे. त्या अभ्यासात हुशार असल्याने जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णा खरकाटे यांनी पुढाकार घेऊन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या मदतीने दोघींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोघी बहिणींना मोठे पाठबळ मिळाले आहे.
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या या बहिणींचे मातृ-पितृछत्र हरपल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. परंतु शिक्षकांनी त्यांना हातभार लावण्यास पुढाकार घेतला आहे. ही बाब आरमोरी येथील कपडा व्यावसायिक मनोज ठकरानी व अशोक ठकरानी यांना माहित होताच त्यांनी मदतीचा हात समोर करून दोन्ही बहिणींना आपल्याकडून शाळेचा गणवेश स्वच्छेने प्रदान केला. निराधार बहिणींना आधाराची गरज आहे.