गडचिरोलीतील हृदयद्रावक घटना ! नऊ महिन्यांच्या गर्भवतीची सहा किमी पायपीट; आधी बाळ गेले, नंतर आईचाही अंत
By संजय तिपाले | Updated: January 2, 2026 20:39 IST2026-01-02T20:38:01+5:302026-01-02T20:39:10+5:30
Gadchiroli : गावात प्रसूतीची सोय नसल्याने नऊ महिन्यांच्या गर्भवतीने जंगलमार्गाने पतीसोबत बहिणीच्या गावी जाण्यासाठी तब्बल सहा किलोमीटर पायपीट केली.

Heartbreaking incident in Gadchiroli! Nine-month pregnant woman walks six km; First the baby dies, then the mother also dies
गडचिरोली : गावात प्रसूतीची सोय नसल्याने नऊ महिन्यांच्या गर्भवतीने जंगलमार्गाने पतीसोबत बहिणीच्या गावी जाण्यासाठी तब्बल सहा किलोमीटर पायपीट केली. पहाटे तिला प्रसवेदना जाणवू लागल्यानंतर रुग्णवाहिकेतून हेडरी (ता. एटापल्ली) येथील लॉयडस् मेटल्सच्या कालीअम्माल हॉस्पिटलमध्ये भरती केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण आधी बाळ आणि काही वेळातच मातेने प्राण सोडले. ही हृदयद्रावक घटना २ जानेवारीला पहाटे घडली. दरम्यान, एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याऐवजी अहेरीला पाठविल्याने मृत्यूनंतर माय- लेकरांची फरफट झाली, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
आशा संतोष किरंगा (२४,रा. आलदंडी टोला ता. एटापल्ली) असे त्या मृत मातेचे नाव आहे. ती नऊ महिन्यांची गर्भवती होती. आलदंछी हे तालुका मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. दरम्यान, प्रसववेदना जाणवताच तातडीने दवाखाना जवळ करता यावा यासाठी १ जानेवारीला आशा किरंगा ही पती संतोष सोबत आलदंडी टोला येथून जंगलातील मार्गाने सहा किलोमीटर पायपीट करत तोडसाजवळील पेठा गावात आपल्या बहिणीच्या घरी राहण्यासाठी गेली. मात्र, दिवसभर अवजडलेल्या स्थितीत चालल्याने २ जानेवारीला रोजी पहाटे २ वाजता तिला प्रसववेदना जाणवण्यास सुरुवात झाली. पेठा गावातील आशासेविकेने हेडरी येथील लॉयडस् कालीअम्माल हॉस्पिटलशी संपर्क करुन रुग्णवाहिका पाचारण केली. रुग्णवाहिकेतून तातडीने दवाखान्यात भरती केले. डॉक्टरांची सिझेरियनचा निर्णय घेतला. मात्र, बाळ पोटातच दगावल्याचे आढळले. त्यानंतर आशा किरंगा यांचा रक्तदाब वाढला, त्यानंतर त्या सावरल्याच नाहीत. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण नियतीने डाव साधलाच. प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राकेश नागोसे यांनी दवाखान्यात धाव घेत सविस्तर माहिती जाणून घेतली.
बाळ व मातेचे शव एटापल्लीहून अहेरीला
उत्तरीय तपासणीसाठी बाळ व मातेचे शव हेडरी येथून एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, तेथे स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने पुढे ४० किलोमीटरवरील अहेरीला पाठवावे लागले. अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयात २ जानेवारी रोजी दुपारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे स्वाधीन केले. माता व बाळाच्या मृत्यूने किरंगा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने दुर्गम भागातील तोकड्या आरोग्यसुविधांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
"संबंधित गर्भवतीच्या आशासेविकांमार्फत गृहभेटी घेतल्याची नोंद आहे. ती पायी चालल्यामुळे तिला अचानक प्रसववेदना झाल्या, डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण यश आले नाही. या घटनेचा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत अहवाल मागवला आहे."
- डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी