परिचारिकांच्या जीवाशी आराेग्य विभागाचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 05:00 IST2021-04-17T05:00:00+5:302021-04-17T05:00:32+5:30

सध्या काेराेनाचे थैमान सुरू असल्याने नियमित आराेग्य कर्मचारी कमी पडत आहेत. त्यामुळे कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिकांची पदे थेट मुलाखतीने भरली जात आहेत. ९ ते १३ एप्रिल या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या. त्यानुसार १६ उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली. विशेष म्हणजे प्रतीक्षा यादीतील सर्वात कमी गुण असलेल्या उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

Health department game with the life of the nurse | परिचारिकांच्या जीवाशी आराेग्य विभागाचा खेळ

परिचारिकांच्या जीवाशी आराेग्य विभागाचा खेळ

ठळक मुद्देनियुक्ती आदेश न देताच प्रशिक्षणाची सक्ती केल्याने आश्चर्य

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत काेविड-१९ च्या अंमलबजावणीकरिता कंत्राटी तत्त्वावर तीन महिन्यांसाठी  अधिपरिचारिकांच्या नियुक्तीसाठी निवड समितीने मुलाखती घेतल्या.  पण प्रत्यक्षात निवड केल्यानंतर त्यांना नियुक्तीचे आदेश न देताच सात दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याची सक्ती केली जात आहे. या सर्व प्रकारासाठी जिल्हा रुग्णालयातील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या डाॅक्टर सेलचे सरचिटणीस तथा डाॅ. साळवे नर्सिंग स्कूलचे संचालक डाॅ. प्रमाेद साळवे यांनी केली आहे.
या विषयावर त्यांनी जिल्हाधिकारी, सीईओ व जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदनही सादर केले. सध्या काेराेनाचे थैमान सुरू असल्याने नियमित आराेग्य कर्मचारी कमी पडत आहेत. त्यामुळे कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिकांची पदे थेट मुलाखतीने भरली जात आहेत. ९ ते १३ एप्रिल या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या. त्यानुसार १६ उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली. विशेष म्हणजे प्रतीक्षा यादीतील सर्वात कमी गुण असलेल्या उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. मात्र त्यापेक्षा अधिक गुण असलेल्या उमेदवारांना अजूनपर्यंत नियुक्तीपत्र देण्यात आले नाही. यावरून या ठिकाणी अनियमितता व मनमानी कारभार असल्याचे दिसून येत आहे. अधिपरिचारिका पदाकरिता ज्यांनी मुलाखती दिल्यात त्यातील काहींना डाॅ. अनुपम महेशगाैरी या अधिकाऱ्याने नियुक्ती आदेश न देता सामान्य रुग्णालयात सात दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठविले. मात्र नियुक्ती आदेश नसल्याने मेट्रनने प्रशिक्षण देण्यास नकार दिला. काेराेनाच्या या गंभीर स्थितीत निवड झालेल्या परिचारिकांना हेलपाटे मारायला लावले जात आहेत. 
काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अधिपरिचारिका व डाॅक्टरांची माेठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. त्यामुळे दर साेमवारी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. हा त्रास यापुढे नियुक्त हाेणाऱ्या इतरही अधिपरिचारिका व डाॅक्टरांना हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
काेराेना वाॅर्डात काम करणे हे जीवावर बेतणारे आहे. अशाही स्थितीत काही युवती काम करण्यासाठी तयार हाेत आहेत. मात्र त्यांना वेगवेगळ्या कारणाने त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार बंद हाेणे आवश्यक आहे, अशी मागणी डाॅ. साळवे यांनी केली आहे. 
 

बरेवाईट झाल्यास जबाबदार काेण? 
नियुक्ती आदेश न देताच प्रशिक्षणाची सक्ती कशासाठी केली जात आहे? प्रशिक्षणाच्या कालावधीत अधिपरिचारिकांच्या जीवाला बरेवाईट झाल्यास यासाठी जबाबदार काेण, असा प्रश्न डाॅ. साळवे यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निवड समितीने अधिपरिचारिकांची निवड केल्यानंतर डाॅ. अनुपम महेशगाैरी हे अधिकारी नियुक्ती आदेश कसे काय थांबवू शकतात, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. महेशगाैरी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आराेप डाॅ. साळवे यांनी केला आहे.

 

Web Title: Health department game with the life of the nurse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.