ह्रदयद्रावक... गोठणगाव गहिवरले; शिक्षक भावंडांचा १२ दिवसांच्या अंतराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 13:29 IST2023-05-05T13:28:13+5:302023-05-05T13:29:52+5:30
कुरखेडा येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली. संजय टेमसूजी बगमारे (५५) व नंदकिशोर टेमसूजी बगमारे (५३) अशी मयतांची नावे आहेत

ह्रदयद्रावक... गोठणगाव गहिवरले; शिक्षक भावंडांचा १२ दिवसांच्या अंतराने मृत्यू
सिराज पठाण/ कुरखेडा
एकाच शाळेत होते कार्यरत: कुटुंबावर दु:खाचा डोंगर कुरखेडा (जि.गडचिरोली): एकाच शाळेत ज्ञानदानाचे काम करणाऱ्या दोन शिक्षकांचा १२ दिवसांच्या अंतराने मृत्यू झाला. त्यामुळे गोठणगाव गहिवरुन गेले. मोठ्या भावाचा १२ व्या दिवशी विधी सुरु असतानाच धाकट्याच्या मृत्यूची बातमी आल्याने कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.
कुरखेडा येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली. संजय टेमसूजी बगमारे (५५) व नंदकिशोर टेमसूजी बगमारे (५३) अशी मयतांची नावे आहेत. मूळचे पळसगाव (ता.कुरखेडा) येथील बगमारे बंधू शिक्षण घेऊन शिक्षक झाले. पुढे ते नोकरीनिमित्त कुरखेडा शहरात स्थायिक झाले. दरम्यान, ते दोघेही गोठणगाव (ता.कुरखेडा) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. २३ एप्रिल रोजी संजय बगमारे यांचा मृतदेह शहरालगतच्या एका शेतातील पाण्यावर तरंगताना आढळला. त्यांनी आत्महत्या केली की विहिरीत पडून मृत्यू झाला, याचे गूढ कायम आहे. अशातच ४ मे रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने नंदकिशोर बगमारे यांचा मृत्यू झाला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कुटुंबियांनी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डाक्टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले.
कुटुंबावर दुहेरी आघात
१२ दिवसांतच दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने गोठणगाववर शोककळा पसरली आहे. कुरखेडा शहरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघेही विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात. त्यांच्या जाण्याने विद्यार्थ्यांनाही शोक अनावर झाला होता. संजय बगमारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तर नंदकिशोर यांच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे. दुहेरी आघात झाल्याने कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे.