'गोंडवाना' विद्यापीठात कर्मचाऱ्यांची पिळवणूक ; व्हाऊचर १८ हजारांचे, मिळतात १२ हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:20 IST2025-07-10T13:20:04+5:302025-07-10T13:20:46+5:30

कुलगुरूंकडे तक्रार : कुलसचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

'Gondwana' University employees are being exploited; vouchers worth 18 thousand, they get 12 thousand | 'गोंडवाना' विद्यापीठात कर्मचाऱ्यांची पिळवणूक ; व्हाऊचर १८ हजारांचे, मिळतात १२ हजार

'Gondwana' University employees are being exploited; vouchers worth 18 thousand, they get 12 thousand

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
गोंडवाना विद्यापीठात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या महिन्याला १८ हजार रुपयांच्या व्हाऊचरवर स्वाक्षरी घेऊन केवळ १२ हजार रुपये हाती ठेवले जातात, अशी गंभीर तक्रार कुलगुरूंना प्राप्त झाली आहे. यात कंत्राटदाराने आम्हाला दर महिन्याला कुलसचिव व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात, असा अजब खुलासा केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.


नागपूर येथील धरमपेठ येथील शेखर रामभाऊ देशपांडे यांनी जून महिन्यात सर्व सिनेट सदस्यांना 'ई-मेल'च्या माध्यमातून एक तक्रार केली होती. यात त्यांनी धक्कादायक खुलासे केले होते. यासोबतच त्यांनी एक तक्रार कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडेही केली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्यावेळी ठरवण्यात आलेल्या वेतनात आणि प्रत्यक्ष मिळणाऱ्या वेतनात मोठी तफावत असल्याचा दावा त्यात केला आहे. विद्यापीठाकडून बाह्यस्त्रोत यंत्रणेला एका कंत्राटी कर्मचाऱ्यामागे २४ हजार रुपये देण्यात येतात; परंतु कंत्राटदार कंपनी कर्मचाऱ्यांकडून १८ हजारावर स्वाक्षरी घेत केवळ १२ हजार वेतनाच्या स्वरूपात देतात. कंत्राटदाराला विचारणा केली असता कुलसचिव व विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आम्हाला पैसे द्यावे लागतात, असे उत्तर मिळते. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असून, यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणीदेखील तक्रारीत करण्यात आली आहे.


कुलसचिव गोत्यात
कुलसचिव आणि विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात, असे गंभीर आरोप करणारे उत्तर दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे कुलसचिव अडचणीत येण्याची शक्यता आहे. याबाबत डॉ. अनिल हिरेखण यांना संपर्क केला असता, 'ही तक्रार तुम्हाला कोणी दिली,' असा प्रतिसवाल त्यांनी केला. आरोपावर भाष्य न करता त्यांनी केवळ चौकशी समिती नेमली आहे, असे सांगून अधिक बोलणे टाळले. 


"यासंदर्भात चौकशी समिती नेमली आहे. येत्या सोमवार-मंगळवारपर्यंत अहवाल येईल. यात कोणी दोषी आढळले तर प्रचलित तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल."
- डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

Web Title: 'Gondwana' University employees are being exploited; vouchers worth 18 thousand, they get 12 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.