लग्नास नकार देत प्रेयसी पोलिस ठाण्यात, प्रियकराने संपविले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 10:39 IST2023-06-20T10:39:15+5:302023-06-20T10:39:41+5:30
चामोर्शी तालुक्यातील घटना: लग्नाचा तगादा लावल्याने प्रेयसीची तक्रार

लग्नास नकार देत प्रेयसी पोलिस ठाण्यात, प्रियकराने संपविले जीवन
घोट (जि. गडचिरोली) : जिच्यावर जीव ओवाळून टाकला, गुलाबी स्वप्न पाहिले तिने ऐनवेळी लग्नास नकार देत पोलिस ठाणे गाठले. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १८ जून रोजी रात्री दहा वाजता घोट (ता. चामोर्शी) येथे घडली. गणेश अशोक कागदेलवार (वय २२, रा. घोट) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
त्याने बीए पदवी मिळवली होती. मिळेल ते काम करून तो घरी हातभार लावत असे. त्याचे गावातीलच एक युवतीशी सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते, त्या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. त्याने तिच्यासोबत संसार थाटण्याचे ठरवले. मात्र, प्रेयसीने लग्नास नकार दिला. एवढ्यावरच ती थांबली नाही तर लग्नासाठी तगादा लावल्याने गणेश कागदेलवारविरोधात तिने घोट पोलिस मदत केंद्रातही धाव घेतली. १८ जून रोजी पोलिसांनी दोघांनाही समोरासमोर बोलावल्यानंतर तिने तक्रार मागे घेतली. त्यानंतर दोघेही आपापल्या घरी गेले. दरम्यान, प्रेयसीने लग्नास नकार देत पोलिस ठाण्यात तक्रार केल्याचा वार गणेश कागदेलवार याच्या जिव्हारी लागला. त्याने रागाच्या भरात घरी लोखंडी आडूला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घोट मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी संदीप रोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुरारी गेडाम तपास करीत आहेत.
आईचा आधार हरवला
मृत गणेश कागदेलवार याला वडील नाहीत. तो एकुलता एक होता. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याने आईचा एकमेव आधार हरवला आहे. त्याच्या आत्महत्येनंतर आईने एकच आक्रोश केला. त्याच्या आईचा आक्रोश मन हेलावणारा होता.