आरमोरी तालुक्यातील घटना : आई-वडील मजुरीला अन् १० वर्षांच्या चिमुरड्याने संपवलं जीवन
By संजय तिपाले | Updated: February 2, 2026 11:31 IST2026-02-02T11:30:55+5:302026-02-02T11:31:31+5:30
Gadchiroli News: आरमोरी तालुक्यातील कोजबी गावातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात एका १० वर्षांच्या निरागस बालकाने मृत्यूला कवटाळल्याने संपूर्ण जिल्हा हळहळत आहे.

आरमोरी तालुक्यातील घटना : आई-वडील मजुरीला अन् १० वर्षांच्या चिमुरड्याने संपवलं जीवन
गडचिरोली - आरमोरी तालुक्यातील कोजबी गावातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात एका १० वर्षांच्या निरागस बालकाने मृत्यूला कवटाळल्याने संपूर्ण जिल्हा हळहळत आहे. संस्कार विनोद कन्नाके असे या बालकाचे नाव असून, रविवारी सायंकाळी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
पोलिसांच्या माहितीनुसार, संस्कारचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरीनिमित्त तेलंगणा राज्यात गेले होते. संस्कार गावातच मोठ्या बहिणीसोबत आजी - आजोबांच्या आश्रयाला राहून जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत होता. रविवारी दुपारी तो बाहेरुन घरी परतला. आजी - आजोबा घरीच होते. मात्र संस्कारच्या मनात नक्की काय सुरू होते, हे कोणालाही उमजले नाही. सायंकाळी ४.३० च्या सुमारास त्याने आजी - आजोबांचे लक्ष नसताना घरातच आडूला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे दृश्य पाहून आजी - आजोबांना धक्का बसला.
मनात नक्की होतं तरी काय?
संस्कारने एवढ्या लहान वयात हे पाऊल का उचलले? शाळेत काही त्रास झाला होता का? आई-वडिलांच्या विरहामुळे तो नैराश्यात होता की गरिबीच्या चटक्याने त्याचे कोवळे मन विदीर्ण झाले होते? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच कोजबीच्या पोलिस पाटील माधुरी सहारे यांनी आरमोरी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे पाठविला. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच अनेक गोष्टींचा उलगडा होईल, असे पोलिस निरीक्षक कैलास गवते यांनी सांगितले.