महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या पतीचा भाजपसोबतच 'घरोबा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 17:12 IST2023-01-28T17:10:07+5:302023-01-28T17:12:16+5:30
संजय पंदिलवार यांचा भाजपप्रवेश

महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या पतीचा भाजपसोबतच 'घरोबा'
आष्टी (गडचिरोला) : गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय पंदिलवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अचानक भाजपमध्ये प्रवेश करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. बावनकुळे हे शिक्षक मतदारसंघाच्या प्रचाराकरिता गडचिरोली येथे आले असता त्यांनी पंदिलवार यांना भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा घालून त्यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत केले.
यावेळी खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, माजी आमदार अंबरिशराव आत्राम, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जेष्ठ नेते बाबूराव कोहळे, रवींद्र ओलालवार, प्रमोद पिपरे उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी रूपाली पंदिलवार जिल्हा महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. पती भाजपवासी झाले असले तरी आपण काँग्रेसमध्येच सक्रिय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पतीचे मन वळवणार
पक्षातील गटबाजीमुळे उद्विग्न होऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी ते मनाने काँग्रेसचेच आहेत, असा मला विश्वास आहे. त्यांचे मन वळवून त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये मी परत आणणार आहे, अशी भावना महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष रूपाली पंदिलवार यांनी ‘लोकमत’जवळ आपली प्रतिक्रिया देताना व्यक्त केली.