गडचिरोली पोलिस दलाचा दबदबा कायम ; ७ शूरवीरांना राष्ट्रपती शौर्य पदक
By संजय तिपाले | Updated: August 14, 2025 17:31 IST2025-08-14T17:18:58+5:302025-08-14T17:31:18+5:30
माओवादविरोधी मोहिमेत प्राणाची बाजी: हेमलकसा-कारमपल्ली रस्त्यावरील चकमकीत धाडसी कारवाई

Gadchiroli Police Force maintains dominance; 7 brave soldiers awarded President's Gallantry Medal
गडचिरोली : घनदाट जंगल, प्रतिकूल भौगोलिक स्थितीत सशस्त्र माओवाद्यांविरुध्द जीवाची बाजी लावून शौर्य गाजविणाऱ्या सात जवानांना पोलिस सेवेतील अतिशय मानाचे समजले जाणारे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पदकांची घोषणा झाली, यात महाराष्ट्रात गडचिरोली पोलिसांनी नेहमीप्रमाणे आपला दबदबा राखला. जिल्हा पोलिस दलाच्या खडतर व शौर्यपूर्ण कामगिरीचा हा सन्मान असल्याच्या प्रतिक्रिया यानंतर उमटल्या.
देशभरात पोलिस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या हस्ते पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे.
पोलिस शौर्य पदकाचे हे आहेत मानकरी
सन २०२५ मध्ये जिल्हा पोलिस दलातील सहायक निरीक्षक नेताजी बंडगर, , सहायक उपनिरीक्षक मनोहर महाका, हवालदार मनोहर पेंदाम, अंमलदार प्रकाश कन्नाके, अतुल येगोलपवार, हिदायत खान हे पोलिस शौर्य पदकाचे मानकरी ठरले. शहीद जवान सुरेश तेलामी यांना मरणोत्तर पोलिस शौर्य पदक मिळाले आहे.
भूसुरुंग स्फोट घडवून हल्ला, धाडसाने मोहीम फत्ते
२०१७ मध्ये सी- ६० जवान कोठी पोलिस ठाण्यातून वाहनांद्वारे भामरागडला परतत होती. माओवाद्यांनी हेमलकसा- कारमपल्ली रस्त्यावर भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. जखमी व अडकलेल्या जवानांचे तसेच स्वतःचे संरक्षण करत सी- ६० जवानांनी माओवाद्यांच्या हल्ल्याला जोरदर प्रत्युत्तर देत मोहीम फत्ते केली. री सदरच्या भूसुरुंग स्फोटादरम्यान केलेल्या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पदकप्राप्त जवानांचे स्वागत केले आहे.
पाच वर्षांत शौर्य पदकांचे द्विशतक
माओवादविरोधी मोहिमांमध्ये सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल मागील पाच वर्षांत जिल्हा पोलिस दलातील अधिकारी - अंमलदारांना ३ शौर्य चक्र, २१० पोलिस शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ८ पदके प्राप्त झाली आहेत.