लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : माओवाद्यांच्या दहशतीला सडेतोड उत्तर देत आणि अतिदुर्गम भागातील विकासाची दारे उघडत गडचिरोलीपोलिस दलाने २४ जानेवारीला भामरागड उपविभागातील बिनागुंडा येथे नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना केली. तब्बल १७०० हून अधिक जवानांच्या ताफ्याने अहोरात्र मेहनत घेत १८ दिवसांत १८ किलोमीटरचा रस्ता बनविला, त्यानंतर बिनागुंडात पोहोचून अवघ्या २४ तासांत हे मदत केंद्र उभे केले. माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यातील हे दहावे पोलिस मदत केंद्र असून यामुळे दहशतीला जबर चपराक बसली आहे.
छत्तीसगड सीमेपासून अवघ्या ७ किमी अंतरावर असलेल्या बिनागुंडा येथे पोहचणे ही प्रशासनासाठी मोठी कसरत होती. मात्र, माओवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी आणि आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांनी जिद्दीने हे पाऊल उचलले. सन २०२३ पासून सुरक्षा पोकळी भरून काढण्याच्या मोहिमेतील हे १० वे केंद्र आहे.
एका दिवसात हे केंद्र उभारण्यासाठी पोलिस दलाने मोठी शक्ती पणाला लावली होती. यात मनुष्यबळ: १००० सी-६० कमांडो , ५०० विशेष पोलिस अधिकारी, १८ बीडीडीएस पथके आणि सीआरपीएफचे जवानांचे सुरक्षा कडे तैनात होते. ११ जेसीबी, ५ पोकलेन, १० ट्रेलर आणि ४० ट्रकच्या साहाय्याने दुर्गम भागात साहित्य पोहोचवून केंद्राची उभारणी पूर्ण करण्यात आली. विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान ) संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफचे कमांडंट शंभु कुमार यांच्यासह अपर अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा आणि गोकुल राज जी. आदी उपस्थित होते.
कनेक्टिविटीचा प्रश्न कायमचा संपणार
या भागात दरवर्षी पावसाळ्यात गुंडेनूर नाल्याच्या पुरामुळे बंगाडी, कुवाकोडी, फोदेवाडा आणि बिनागुंडा या गावांचा चार महिने जगाशी संपर्क तुटायचा. आता पोलिस मदत केंद्रामुळे या नाल्यावरील पुलाच्या कामाला सुरक्षा मिळेल. तसेच या भागातील रखडलेले ७ मोबाईल टॉवर आणि राष्ट्रीय महामार्गाचे काम आता युद्धपातळीवर पूर्ण होईल, असा विश्वास पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला.
खाकीची मायेची ऊब, साहित्यांचे वाटप
उद्घाटनानंतर आयोजित जनजागरण मेळाव्यात उपस्थित ग्रामस्थांना साड्या, धोतर, ब्लँकेट, भांडी आणि मच्छरदानीचे वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना दप्तर, वही-पेन आणि खेळण्यासाठी क्रिकेट व व्हॉलीबॉल किट देण्यात आले. यामुळे पोलिस आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक घट्ट झाल्याचे पाहायला मिळाले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिकांशी संवाद साधून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जवानांसोबत वनभोजन करुन त्यांचे मनोधैर्य वाढविले.
Web Summary : Gadchiroli Police established a new aid center in Binagunda, countering Maoist influence. The center aims to bridge the security gap, boost development, improve connectivity, and foster trust with locals through community outreach programs and essential supplies distribution.
Web Summary : गढ़चिरौली पुलिस ने बिनागुंडा में माओवादी प्रभाव का मुकाबला करते हुए एक नया सहायता केंद्र स्थापित किया। केंद्र का उद्देश्य सुरक्षा अंतर को पाटना, विकास को बढ़ावा देना, कनेक्टिविटी में सुधार करना और सामुदायिक आउटरीच कार्यक्रमों और आवश्यक आपूर्ति वितरण के माध्यम से स्थानीय लोगों के साथ विश्वास को बढ़ावा देना है।