गडचिरोलीतील आष्टीत गळा चिरुन वृद्धाची हत्या, घराला टाळे लावून मारेकरी पसार
By संजय तिपाले | Updated: December 16, 2024 20:36 IST2024-12-16T20:35:05+5:302024-12-16T20:36:20+5:30
Gadchiroli Crime News: गडचिरोली येथे किरायाने वास्तव्यास असलेल्या एका दिव्यांग वृध्दाची धारदार शस्त्राने गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर मारेकरी घराला कुलूप लावून पसार झाले. चार दिवसांपासून ते फोन घेत नव्हते, त्यामुळे नातेवाईकांनी धाव घेतली तेव्हा त्यांचा मृतदेह आढळून आला.

गडचिरोलीतील आष्टीत गळा चिरुन वृद्धाची हत्या, घराला टाळे लावून मारेकरी पसार
- संजय तिपाले
गडचिरोली - येथे किरायाने वास्तव्यास असलेल्या एका दिव्यांग वृध्दाची धारदार शस्त्राने गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर मारेकरी घराला कुलूप लावून पसार झाले. चार दिवसांपासून ते फोन घेत नव्हते, त्यामुळे नातेवाईकांनी धाव घेतली तेव्हा त्यांचा मृतदेह आढळून आला. ही थरारक व रहस्यमय घटना चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे १५ डिसेंबरला उघडकीस आली.
रशीद अहमद शेख (६०,रा. बुटी बोरी, नागपूर) असे मयताचे नाव आहे. ते पायाने दिव्यांग होते. रशीद शेख गेल्या २० वर्षांपासून आष्टी येथे किरायाने घर घेऊन राहत होते. दरम्यान, ते अविवाहित होते, त्यांचे नातेवाईक नागपूरला बुटी बोरीला राहतात. नातेवाईकांचा त्यांच्याशी संपर्क होत नव्हते, त्यामुळे १५ रोजी नागपूरहून काही नातेवाईक आष्टीत आले. त्यांच्या घराला बाहेरुन टाळे होेते. खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना कळविले. पो.नि. विशाल काळे यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. कुलूप तोडून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यांच्या गळ्यावर व पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले.
नागपूरला येतो म्हणाले अन्....
१२ डिसेंबरला रशीद शेख यांचे नागपूरच्या नातेवाईकांशी फोनवरुन संभाषण झाले होते. मी नागपूरला येतो, असे ते म्हणाले होते, पण त्याआधीच त्यांची हत्या झाली. नातेवाईकांनी त्यांना वारंवार कॉल केला, पण फोन कोणी उचलत नच्हते, नंतर मोबाइल स्वीच ऑफ झाला. त्यामुळे नातेवाईकांना शंका आली व त्यांनी आष्टी गाठले. त्यानंतर खुनाची रहस्यमय घटना उघडकीस आली.
घटनास्थळी विविध पथकांच्या भेटी
घटनास्थळी गुन्हे शाखा, श्वानपथक, ठसेतज्ज्ञ तसेच फॉरेन्सिक चमूने भेट दिली. श्वान घराजवळच घुटमळले. आष्टी ठाण्यात अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून
संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत. अद्याप कुठलाही क्ल्यू पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेने आष्टीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत वृध्दाचा खून कोणी व कशासाठी केला, हे अद्याप अस्पष्ट आहे. काही संशयितांकडे चौकशी सुरु आहे. तपास सुरु आहे. लवकरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल.
- विशाल काळे, पो.नि. आष्टी