Gadchiroli | कुरखेडा शहराच्या सीमेवर पाेहाेचला जंगली हत्तींचा कळप; नागरिकांमध्ये दहशत
By दिगांबर जवादे | Updated: September 19, 2022 17:07 IST2022-09-19T17:05:30+5:302022-09-19T17:07:07+5:30
सभाेवतालच्या शेतीचे केले नुकसान

Gadchiroli | कुरखेडा शहराच्या सीमेवर पाेहाेचला जंगली हत्तींचा कळप; नागरिकांमध्ये दहशत
कुरखेडा (गडचिरोली ) : शहरापासून अगदी ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या सती नदीचे पात्र ओलांडत रानटी हत्तींचा कळप कुरखेडा शहराच्या अगदी सिमेवर पाेहाेचला असल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील आठवड्यात दादापूर मार्गे कुरखेडा तालूक्यात प्रवेश करणारा रानटी हत्तींच्या कळपाने शिवणी, सालाईटोला, चांदागड, चिनेगाव, पळसगाव, घाटी, वाघेडा जगंल मार्गे धान व अन्य पिकांची नासधूस करीत आता चक्क कुरखेडा शहराचा सिमेपर्यंत धडक दिलेली आहे.
हत्तींचा कळपाने चिखली येथील दिलीप लिल्हारे, अशोक लिल्हारे, ओकट मोहरे, मन्नालाल मोहरे, मनिराम मडावी, माटी लिल्हारे, चिचटोला येथील द्वारका मडावी, रघू मडावी, महासिंह मडावी, अरूण सिंन्द्राम, विश्वनाथ सिंन्द्राम, रघूनाथ मडावी, सहासिंग मडावी, रामकीसन उईके, देवा सिंद्राम, रामचंद्र सिंद्राम यांच्या शेतातील धान पिकांची मोठी नासाडी केली. गर्भात असलेले हलक्या प्रजातीचे अनेकांचे धान पीक भूईसपाट झाले आहे.
हत्तींचा कळप मागीलवर्षी जिल्ह्यात आला हाेता. काही महिने जिल्ह्यात फिरल्यानंतर ताे परत गेला. मागील महिनाभरापासून हा कळप पुन्हा जिल्ह्यात दाखल झाला आहे. या कळपात एकूण २३ हती आहेत. धानाेरा व कुरखेडा तालुक्यातील शेती, घरांचे नुकसान केल्यानंतर आता हा कळप थेट कुरखेडा शहराच्या जवळपास पाेहाेचला आहे. शहरात शिरकाव केल्यास माेठी दहशत निर्माण हाेण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमधील हुल्ला टीम दाखल
हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चीम बंगाल राज्यातील हुल्ला नावाची ३५ सदस्यांची टीम कुरखेडात दाखल झाली आहे. या हत्तींना शहरापासून दूर नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.