हेक्टरवरून आले एकरावर, ७५ टक्के शेतकरी अल्पभूधारक

By दिगांबर जवादे | Published: May 13, 2024 05:47 PM2024-05-13T17:47:56+5:302024-05-13T17:48:21+5:30

लोकसंख्या वाढली अन् हिस्सेदारीही : जमिनीचे झाले अनेक तुकडे

From hectare to acre, 75 percent of farmers are smallholders | हेक्टरवरून आले एकरावर, ७५ टक्के शेतकरी अल्पभूधारक

From hectare to acre, 75 percent of farmers are smallholders

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीची हिस्सेदारी वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील ४५ टक्के शेतकऱ्यांकडे एक हेक्टरपेक्षा कमी व ३५ टक्के शेतकऱ्यांकडे १ ते २ हेक्टर एवढीच जमीन आहे. केवळ २५ टक्के शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे. ही बाब भविष्यात चिंता वाढवणारी आहे.

देशात औद्योगिक क्रांती झाली असली तरीही ग्रामीण भागातील ८० टक्के जनता शेतीशेतीवर आधारित व्यवसायांवरच जीवन जगत आहे. त्यामुळे शेतीचे महत्त्व अजूनही कमी झाले नाही. ५० पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आता दुसरा रोजगार शोधणे व करणे कठीण आहे. त्यामुळे शेतीत शंभर भानगडी असल्या तरी ते शेतीच करत असतात. शासनही शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात असलेले जमिनीचे क्षेत्र ही मुख्य अडचण निर्माण झाली आहे. अल्पभूधारक शेतकरी कशी तरी जमीन कसून जीवन जगत असतात.


त्यामुळे स्वतः शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान व यंत्र खरेदी करणे त्यांना शक्य नसते. मात्र, शासनालाही त्याला लाखो रुपये किमतीचे तंत्रज्ञान व यंत्र अल्पभूधारक शेतकऱ्याला सबसिडीवर देणे परवडत नाही. परिणामी, पारंपरिक पद्धतीनेच शेती केली जात आहे. त्यामुळे त्याची उत्पादकता कमी आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी शासकीय अनुदानासाठी खातेफोड करून जमिनीत हिस्सेदारी वाढविल्याचेही दिसून येत आहे.


आधुनिक तंत्रज्ञान वापरणे अशक्य
● शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र, शेतजमिनीच्या लहानशा तुकड्यात आधुनिक तंत्रज्ञान बसवणे कठीण होते. तसेच शेतीच्या उत्पन्नावर कसेतरी जीवन जगणारा शेतकरी लाखो रुपयांचे आधुनिक तंत्रज्ञान व यंत्र बसवू शकत नाही.
● आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सामूहिक शेती हा पर्याय आहे. त्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. मोठ्या यंत्रांवर सबसिडी देताना बचत गट निर्माण करण्याचे आवाहन केले जात आहे. बचत गटालाच सबसिडी दिली जात आहे. मात्र, सामूहिक शेती करण्यास येथील शेतकरी तयार होत नाही.


जोडधंद्यांऐवजी मजुरीवरच भर
शेती कमी प्रमाणात असली तरी शेतीशी संबंधित जोडधंदा केल्यास आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. मात्र, अल्पभूधारक शेतकरी जोडधंदा करण्याऐवजी मजुरी करण्यास पंसती दर्शवितात. मजुरीसाठी काही महिने दुसऱ्या राज्यात राहतात. त्या मजुरीतून काही महिन्यांच्या जगण्याची तजवीज होते.


जिल्ह्यातील शेतकरी संख्या जमिनीचे प्रमाण                            शेतकरी संख्या
अत्यल्प (० ते १ हेक्टर) टक्के ४५%                                                 ५७,३४२
अल्प (१ ते २ हेक्टर) टक्के ३०%                                                     ४१,४६६
मोठे (२ हेक्टरपेक्षा अधिक) टक्के २५%                                          ३६,०२५
एकूण शेतकरी                                                                              १,३४,८३३


दोन पिके घेण्याकडे वाढला कल
• शासनाकडून विहीर खोदण्यासाठी सबसिडी दिली जात आहे. या विहिरीच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा निर्माण होत आहे. त्यामुळे काही शेतकरी खरिपासह उन्हाळ्यातही पिके घेण्यास पसंती दर्शवत आहेत. मात्र, हे प्रमाण अतिशय कमी आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून विहिरीच्या पाण्याचा पुरेपूर उपयोग करण्याची गरज आहे.


 

Web Title: From hectare to acre, 75 percent of farmers are smallholders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.