Forest ponds overflow | जंगलातील तलाव ओव्हरफ्लो
जंगलातील तलाव ओव्हरफ्लो

ठळक मुद्देवन्यजीवांची सोय : पाळीवरून पाणी जात असल्याने फुटण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वैरागड-आरमोरी रोडलगतच्या वैरागडपासून चार किमी अंतरावर जंगलात तलाव आहे. या तलावाला पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाते. जोरदार पावसामुळे हा तलाव पूर्ण भरला असून पाळीवरून पाणी जात असल्याने हा तलाव फुटण्याची शक्यता आहे.
वनविभागाने या वनतलावाची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. कारण उन्हाळ्यात सदर तलावातील पाण्यावर वन्यजीवाची तहाण भागत असते. आंतरभागात हा तलाव खोल असल्याने व पाणी साठवणूक क्षमता अधिक असल्याने वैरागड, रामाळा, पळसगाव, सालमारा व परिसरातील लोक या तलावाचे नामकरण पाण्याची टाकी, असे केले आहे. या तलावाच्या नामकरणाबाबत अनेक जाणकार सांगतात. यावर्षी सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने जंगलातील हा तलाव तुडूंब भरला आहे. तलावाच्या दर्शनी भागातून पाळीवरून पाणी जात असल्याने तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या तलावाच्या पाळीची थोडीफार डागडुजी केल्यास हा धोका टळू शकतो. उन्हाळ्यात या पाण्याचे संकट निर्माण होते. तेव्हा सालमारा, रामाळा, वैरागड व वासाळा जंगल परिसरातील वन्यजीव याच तलावावर येऊन तहाण भागवित असतात. उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी वनविभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून सुविधा केल्या जातात. नैसर्गिकरित्या पाण्याची झालेली साठवण सांभाळून ठेवण्यासाठी वनविभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. यंदा जिल्हाभरातील वनतलावामध्ये भरपूर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा उन्हाळ्यापर्यंत टिकण्यासाठी प्रयत्न व्हावे.


Web Title: Forest ponds overflow
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.