पोर्ला वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींच्या कळपाची प्रथमच एन्ट्री; तीन गावातील धान पीक तुडविले

By गेापाल लाजुरकर | Published: October 12, 2023 09:56 AM2023-10-12T09:56:18+5:302023-10-12T09:58:44+5:30

गेल्या दोन वर्षांपासून वडसा वन विभागात रानटी हत्तींचा धुडगूस सुरूच आहे.

First entry of herd of wild elephants in Porla forest reserve | पोर्ला वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींच्या कळपाची प्रथमच एन्ट्री; तीन गावातील धान पीक तुडविले

पोर्ला वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींच्या कळपाची प्रथमच एन्ट्री; तीन गावातील धान पीक तुडविले

गडचिरोली : गेल्या दोन वर्षांपासून वडसा वन विभागात रानटी हत्तींचा धुडगूस सुरूच आहे. यातच रानटी हत्तीच्या कळपाने खोब्रागडी नदी ओलांडून चार दिवसांपूर्वी इंजेवारीच्या जंगलातून प्रथमच पोर्ला वनपरिक्षेत्रात प्रवेश केला होता. ११ ऑक्टोबर रोजी हत्तींनी पोर्ला वनपरिक्षेत्रातील पोर्ला, नगरी व मोहझरी येथील शेतात धुडगूस घालून धान पीक तुडविले.

तीन गावातील पिकांची नासधूस केल्यानंतर २१ च्या संख्येत असलेल्या हत्तींच्या कळपाने सायंकाळी देलोडा- पोर्ला मार्ग ओलांडला. याची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. सध्या हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू आहे मध्यम प्रतीचे धान निसवत आहे,तर जड प्रतीचे धान पंधरवड्यात निसवण्याची शक्यता आहे. अशास्थितीत हाती येत असलेले पीक हत्तींच्या कळपाकडून नासधूस करून नष्ट होण्याची शक्यता आहे. रानटी हत्तींच्या कळपाने बुधवारी सिर्सी- इंजेवारी जंगलातून पोर्ला परिसरात धडक दिली. या भागातील शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासधूस केली. त्यानंतर देलोडा परिसरात दाखल झाले. या परिसरातील सूर्यडोंगरी, वसा बोडधा, वडधा, बोरी, सिर्सी आदी गावे जंगलाला लागून आहेत. येथील शेतकऱ्यांचे धान पीक नष्ट होण्याची शक्यता असल्याने वनविभागाने हत्तींना जंगलाच्या दिशेने वळवावे तसेच कळपावर नियंत्रण नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

पोर्ला वनपरिक्षेत्रात सध्या तीन गावातील धान पिकांची नासधूस रानटी हत्तींच्या कळपाने केली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांनी पंचनाम्यासाठी अर्ज सादर करावे. नुकसानग्रस्तांना १५ दिवसांत भरपाई दिली जाईल.
- राकेश मडावी, वनपरिक्षेत्र अधिकारी पोर्ला

Web Title: First entry of herd of wild elephants in Porla forest reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.