फरार कैद्याने नाव बदलून थाटला दुसरा संसार; ११ वर्षांनंतर माहित पडले 'हा तर पहिल्या पत्नीचा मारेकरी..'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:29 IST2026-03-23T15:28:27+5:302026-03-23T15:29:30+5:30
Gadchiroli : पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून निघृण खून करून जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना कारागृहातून फरार झालेल्या एका सराईत गुन्हेगाराला गडचिरोली पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

Escaped prisoner changes name and starts a new life; 11 years later, it is revealed that he is the murderer of his first wife..
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून निघृण खून करून जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना कारागृहातून फरार झालेल्या एका सराईत गुन्हेगाराला गडचिरोली पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.
पुरुषोत्तम रामजी भोयर (४०, रा. गडचिरोली , ह. मु उसेगाव, ता. सावली, जि. चंद्रपूर) असे या आरोपीचे नाव असून, त्याने नाव बदलून आणि पुन्हा लग्न करून तब्बल ११ वर्षे पोलिसांना गुंगारा दिला होता. मात्र, दुसऱ्या पत्नीला केलेल्या मारहाणीमुळे त्याचे जुने 'कारनामे' चव्हाट्यावर आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पुरुषोत्तम भोयर याने २००५ मध्ये पहिल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची अत्यंत निघृण हत्या केली होती. याप्रकरणी २००७ मध्ये त्याला कलम ३०२, २०१ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना, १५ जून २०१५ रोजी नागपूर खुल्या कारागृहाबाहेरील कामाच्या दरम्यान तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता.
ओळख बदलून मिस्त्री काम
कारागृहातून पळून आल्यानंतर पुरुषोत्तमने आपली खरी ओळख लपविली. तो सावली तालुक्यातील उसेगाव येथे वास्तव्यास होता. तिथे त्याने आपले नाव बदलले आणि मिस्त्री काम करून उदरनिर्वाह करू लागला. इतकेच नव्हे, तर त्याने तिथे दुसरे लग्न करून नवा संसारही थाटला होता. कोणालाही संशय येऊ नये याची त्याने पुरेपूर खबरदारी घेतली होती.
दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीने फास आवळला
पुरुषोत्तमच्या संशयी स्वभावामुळे त्याने दुसऱ्या पत्नीलाही त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या मारहाणीला कंटाळून त्याची पत्नी माहेरी गडचिरोली येथे निघून आली. मात्र, तिथेही जाऊन त्याने तिला शिवीगाळ करत धमकावले.
या छळाला कंटाळून पत्नीने गडचिरोली पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला. जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि दस्तऐवजांची पडताळणी केली, तेव्हा समोर आलेल्या माहितीने पोलिसही चक्रावून गेले.
तपासणीत स्पष्ट झाले की, तक्रार करणाऱ्या महिलेचा पती दुसरा-तिसरा कोणी नसून ११ वर्षांपासून फरार असलेला जन्मठेपेचा कैदी पुरुषोत्तम भोयर आहे. पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तातडीने फौजफाटा खाना करून त्याच्या मुसक्या आवळल्या. गडचिरोली पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा रवाना केले.