पोलिसांनी उधळला घातपाताचा कट, भूसुरुंग स्फोट व चकमकीनंतर नक्षलवादी जंगलात पळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 23:40 IST2020-03-15T23:38:54+5:302020-03-15T23:40:33+5:30
हेडरी पोलीस आणि सीआरपीएफ बटालियन 191 च्या कंपनी सी चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.

पोलिसांनी उधळला घातपाताचा कट, भूसुरुंग स्फोट व चकमकीनंतर नक्षलवादी जंगलात पळाले
गडचिरोली : जिल्ह्यातील हेडरी उपविभागांतर्गत बोडमेटा जंगल परिसरात रविवारी जिल्हा पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांचा हल्ला परतवून लावत घातपाताचा कट उधळून लावला. यावेळी भूसुरुंग स्फोट घडविण्यासोबतच दोन्ही बाजूने गोळीबार झाला. पण कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, हेडरी पोलीस आणि सीआरपीएफ बटालियन 191 च्या कंपनी सी चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला असता नक्षलवादी जंगलात पळून गेले. यानंतर पोलीस जवानांनी जंगलात शोधमोहीम राबविली असता घटनास्थळी नक्षवाद्यांनी आणखी एक भूसुरुंग पेरून ठेवल्याचे निदर्शनास आले. समायसुचकता दाखवत तो भूसुरुंग पोलिसांनी निकामी केला. यावेळी नक्षलवाद्यांचे काही साहित्यही पोलिसांच्या हाती लागले.