लेकाला खाकी वर्दीत पाहण्याचे स्वप्न अधुरे, आढळला मृतदेह

By संजय तिपाले | Updated: January 25, 2025 12:40 IST2025-01-25T12:38:02+5:302025-01-25T12:40:49+5:30

कुरखेडाची घटना: घातपाताचा संशय, कुटुंबीयाचा आक्रोश

Dream of seeing son in khaki uniform unfulfilled, body found | लेकाला खाकी वर्दीत पाहण्याचे स्वप्न अधुरे, आढळला मृतदेह

Dream of seeing son in khaki uniform unfulfilled, body found

गडचिरोली : बीएससी द्वितीय वर्षात शिकणारा एकुलत्या एक मुलाला खाकी वर्दीत पाहण्याचे स्वप्न गरीब आई- वडिलांनी पाहिले होते, पण दुर्दैवाने त्याचा मृतदेह आढळून आला. हृदय पिळवटणारी ही घटना २५ जानेवारीला सकाळी कुरखेडा येथे उघडकीस आली. मृत्यूचे गूढ कायम असून घातपाताचा संशय व्यक्त होत आहे.

रोहित राजेंद्र तुलावी (२०,रा. जैतपूरटोला ता. कुरखेडा) असे मयताचे नाव आहे. घरी आई - वडील, वृध्द आजी व बहीण असा हा परिवार. शेतीसह मजुरीकाम करुन गुजराण करणाऱ्या रोहितची पोलिस बनण्याची इच्छा होती. कुरखेडा येथील मुनघाटे महाविद्यालयात तो बीएससी द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. यासोबतच पोलिस भरतीचीही तयारी करायचा. त्यासाठी रोज पहाटे उठून तो धावायला व व्यायामाला जात असे. २४ रोजी रात्री नित्याप्रमाणे जेवण करुन झोपी गेला. त्यानंतर पहाटे तो गायब होता. नित्याप्रमाणे फिरायला गेला असावा असे समजून कुटुंबीयांनी लक्ष दिले नाही. त्यानंतर त्याचा मृतदेह  कुंभीटोला मार्गावरील सतीनदीपात्रात आढळल्याची बातमी आली अन् कुटुंबाला धक्काच बसला.  नदीपात्रात  पाणी नव्हते. रेतीमध्ये तो निपचित पडलेला आढळला. बनियान, शर्ट व स्वेटर बाजूला काढून ठेवलेले होते, तर अंगावर केवळ पँट होती. 

कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील खरे कारण उजेडात येईल, असे पो.नि. महेंद्र वाघ यांनी सांगितले.  सर्व बाजूंनी तपास केला जाईल, असे ते म्हणाले.

नदीपात्रात तोबा गर्दी, मृत्यूचे गूढ कायम
दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना रोहित तुलावी याचा मृतदेह आढळून आला.  त्यांनी ही बाब शहरात कळवली. त्यानंतर सतीनदीपात्रात मोठी गर्दी झाली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला, त्यामुळे वातावरण शोकमग्न झाले होते. रोहितचा मृत्यू नेमका कसा झाला, तो कोणासोबत व्यायामाला गेला होता, हे पोलिसांच्या चौकशीतच समोर येणार आहे. त्याच्या शरीरावर मारहाणीचे व्रण  नाहीत, त्यामुळे मृत्यूमागचे गूढ वाढले आहे.
 

Web Title: Dream of seeing son in khaki uniform unfulfilled, body found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.