कामबंद आंदोलन करणार
By Admin | Updated: May 10, 2017 01:43 IST2017-05-10T01:43:16+5:302017-05-10T01:43:16+5:30
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणारे सर्व कंत्राटी

कामबंद आंदोलन करणार
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणारे सर्व कंत्राटी कर्मचारी १८ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार, असा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी निवेदनातून देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन परिपत्रकानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बाह्यस्थ मनुष्यबळाची नियुक्ती २००८ पासून जिल्हा सेतू समितीमार्फत करण्यात आली. या कालावधीत जिल्ह्याने राज्यस्तरावर याच कंत्राटी मनुष्यबळाच्या आधारे अनेक राज्यस्तरीय तथा देशपातळीवरील पुरस्कार प्राप्त केलेले आहेत व योजनेची व्याप्ती वाढविली आहे.
जिल्हा अतिदुर्गम व डोंगराळ भागात तसेच नक्षलग्रस्त भागात वसलेला आहे. असे असतानाही कंत्राटी कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. राज्यात पूर्वीपासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हा सेतू समितीमार्फत करण्यात येत आहे. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे व या योजनेच्या यशात मोलाचे योगदान आहे. स्वयंसेवी संस्थांमार्फत नवीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून कार्यरत कर्मचाऱ्यांवर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ उद्भवणार आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून निविदा मागे घ्यावी, अन्यथा मग्रारोहयोंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी १८ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन करतील, असा इशारा जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
जिल्हा सेतू समितीमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्तीसंदर्भात देण्यात येणारे आदेश पूर्वीप्रमाणे देण्याची पद्धत सुरू करावी, जर बाह्यस्थ पद्धतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असेल तर प्राधान्याने सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे संरक्षण मिळावे, शिवाय सध्या ज्या संवर्गातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एकत्रित मानधन मिळत आहे. ते कायम ठेवण्यात यावे, शासन शुद्धीपत्रकानुसार ८ टक्के वाढ झालेल्या शासन निर्णयातील अटी लागू राहतील, असे बंधनकारक करावे, जाहिरातीमध्ये दिलेली निविदा रद्द करून पूर्वीप्रमाणे जिल्हा सेतू समितीमार्फत सर्व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावे, आजतागायत कार्यरत रोहयो कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन सर्वांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.