The district got a mobile leprosy referral service center | जिल्ह्याला मिळाले फिरते कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र

जिल्ह्याला मिळाले फिरते कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन : दुर्गम भागातील रुग्णांसाठी फायदेशिर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील कुष्ठरुग्णांना तातडीने संदर्भ सेवा मिळण्यासाठी जिल्ह्याला फिरते कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र मिळाले. एका सुसज्ज वाहनाच्या माध्यमातून चालविले जाणारे हे केंद्र कुष्ठरोगाच्या रुग्णांंना संदर्भ सेवा देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या फिरत्या संदर्भ सेवा केंद्राचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत गरीब आदिवासी जनतेला चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी हा एक मानाचा तुरा असल्याचे गौरवोद्गारही व्यक्त केले. तर फिरते कुष्ठरोग सेवा केंद्रामुळे कुष्ठरोग्यांच्या दारी जाऊन उपचार करणे शक्य होणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कुष्ठरुग्णांना देवू केलेले व्हॅक्स बाथ, ड्रेसिंग किट, मसल स्टिम्युलेटर, एमसीआर चप्पल व स्प्लिन्ट, गॉगल अशा विविध उपकरणांची पडताळणी करून भविष्यात कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठीच्या योजनांवर चर्चा केली.
प्रास्ताविक कुष्ठरोग संदर्श सेवेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळवे यांनी तर आभार डॉ.रूपेश पेंदाम यांनी मानले. यावेळी डॉ.तारा वलके, डॉ.पंकज हेमके, राजेंद्र ठोके, शिवचरण ठाकरे, पुरूषोत्तम तुपट यांच्यासह इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

४२२ जणांवर उपचार
जिल्ह्यात आजघडीला ४२२ कुष्ठरुग्णांवर उपचार सुरू असून जुने ४०९ विकृतीचे रुग्ण आहेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता दुर्गम भागातील रुग्णांना उपचारासाठी कुष्ठरोग केंद्रावर पोहोचणे शक्य नाही त्या रुग्णांना कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्राच्या माध्यमातून ठराविक दिवशी गावात पोहोचून सेवा दिली जाणार आहे.
 

Web Title: The district got a mobile leprosy referral service center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.