सिरोंचा : मूलभूत गरजांपैकी निवाऱ्यात वापरली जाणारी वीज अत्यावश्यक सेवेत गणली जाते. विजेच्या भरवशावर व्यक्ती विविध प्रकारची उपकरणे साेयीसुविधांसाठी वापरू शकताे; परंतु वीजदरवाढीचे चटके जर ग्राहकांना बसत असतील तर साहजिकच नाराजीचा सूर उमटणारच. त्यातही काही अंतरावर असलेल्या गावांमध्ये निम्मा दर असेल तर ग्राहकांमध्ये राेष उफाळणारच.
असाच प्रकार महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर आहे. तेलंगणा राज्यातील ग्राहकांपेक्षा दुप्पट वीज देयके सिराेंचा तालुक्यातील ग्राहकांना भरावी लागत आहेत.
तेलंगणा राज्यात वीज युनिट दर महाराष्ट्रापेक्षा कमी आहेत. महाराष्ट्रात विशिष्ट युनिट मर्यादेनुसार वीजदर निश्चित केला जात असला तरी वहन आकारासह अन्य कर आकारला जात असल्याने युनिट दराच्या बराेबरीत एकूण रक्कम द्यावी लागते. इतर आकार व युनिट आकार असा अतिरिक्त बाेजा ग्राहकांवर पडताे. ही स्थिती महाराष्ट्रात पहावयास मिळते. राज्याच्या अंतिम टाेकावर असलेल्या सिराेंचा तालुका मुख्यालयापासून अवघ्या तीन किमी अंतरावर तेलंगणा राज्याची सीमा आहे. या भागात तेलंगणातील गावे असून, येथील वीज ग्राहकांना महाराष्ट्राच्या तुलनेत निम्मे वीज बिल भरावे लागते. तेलंगणा राज्यात १६४ युनिट विजेचा वापर केल्यास ६९४ रुपये बिल भरावे लागते, तर महाराष्ट्रात १६४ युनिट वीज वापरल्यास १ हजार २०४ रुपयांचे बिल भरावे लागते. म्हणजेच युनिटचा वापर सारखाच केला तरीही वीतबिलात मात्र प्रचंड तफावत दिसून येते. राज्या-राज्यांत वीज कंपन्यांचे कर वेगवेगळे असतील; परंतु दुप्पट रकमेएवढी तफावत राहणे याेग्य आहे का, असा सवाल तालुक्यातील ग्राहकांकडून केला जात आहे.
बॉक्स
...तर वीजदर कमी हाेणार काय?
सिराेंचा तालुक्यातील वीज समस्या सुटण्यासाठी येत्या काही दिवसांत तेलंगणा राज्याचा मंचेरियाल जिल्ह्यतील जयपूर पॉवर प्लांटहून सिरोंचाच्या पॉवर स्टेशनला टॉवर लाइनने जोडले जाणार आहे. तेलंगणा राज्यातील विद्युतचा वापर तालुक्यातील ग्राहक करतील. त्यामुळे जे दर तेलंगणात आहेत, तेच दर सिराेंचा तालुक्यात लागू राहतील काय, असा सवालही तालुक्यातील ग्राहक करीत आहेत.