होणारा विध्वंस टळला ! जवानांची रेकी करणाऱ्या कट्टर नक्षल समर्थकाला अटक
By संजय तिपाले | Updated: October 1, 2025 13:45 IST2025-10-01T13:38:14+5:302025-10-01T13:45:50+5:30
घातपाताचा होता डाव : भामरागडमधून आवळल्या मुसक्या

Destruction averted! A staunch Naxal supporter who was scouting for soldiers was arrested
गडचिरोली : भामरागड परिसरात घातपात घडवून आणण्यासाठी सुरक्षा दलांची रेकी करणाऱ्या एका कट्टर नक्षल समर्थकाला पोलिस दल व सीआरपीएफच्या जवानांनी २९ सप्टेंबरला अटक केली. सैनू उर्फ सन्नू अमलू मट्टामी (३८,रा. पोयारकोठी ता. भामरागड) असे त्याचे नाव आहे. भामरागड परसिरातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
सैनू मट्टामी हा २७ ऑगस्ट रोजी कोठी हद्दीतील कोपर्शी-फुलनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीत सक्रिय होता, हे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर विविध विध्वंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. २९ सप्टेंबर रोजी भामरागड पोलिस व सीआरपीएफ ३७ बटालियनचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित असताना गोपनीय माहितीच्या आधारे त्यास ताब्यात घेतले.
या कारवाईत भामरागड पोलिस, व सीआरपीएफ जवान यांनी संयुक्तरीत्या सहभाग घेतला. विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उप-महानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
"माओवादी हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगावे. परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात येणार आहे."
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक