पेपरमिल बंद असूनही स्थायी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन सुरू
By Admin | Updated: April 2, 2017 01:40 IST2017-04-02T01:40:36+5:302017-04-02T01:40:36+5:30
१५ जून २०१६ पासून आष्टी येथील पेपरमिल पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार बंद आहे.

पेपरमिल बंद असूनही स्थायी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन सुरू
पत्रकार परिषद : मजदूर सभा युनियनचे आरोप बिनबुडाचे
आष्टी : १५ जून २०१६ पासून आष्टी येथील पेपरमिल पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार बंद आहे. खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींनी याबाबत कधी विचारणा केलेली नाही. १० महिन्यापासून मिल बंद असूनही मजदूर सभा युनियनचे अध्यक्ष तथा कामगार नेते नरेशबाबू पुगलिया यांच्या पुढाकाराने स्थायी कर्मचाऱ्यांचे पगार सुरू असणारी ही एकमेव मिल आहे, अशी माहिती पेपरमिल मजदूर सभा युनियनचे महासचिव बी. सी. बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जि.प. सदस्य रूपाली पंदिलवार, संजय पंदिलवार, सतीश खेडीकर, श्रीधर भगत, प्रदीप मुखर्जी, रामचंद्र बामणकर, दुशांत चांदेकर, शंकर मारशेट्टीवार, पंकज पस्पुलवार, सुधाकर अल्लेवार, दिलीप शेख, सर्वेश श्रीवास्तव, डी. एल. झाडे, सत्यजीत रॉय, के. पी. मंडल, बी. एम. खोब्रागडे आदी उपस्थित होते.
१० महिन्यात कंपनीला उत्पन्न नसतानाही आॅगस्ट २०१६ ला १ कोटी ४ लाख रूपये वाढीव वेतनाची रक्कम, २०१५-१६ मध्ये ९० लाख रूपयांचा बोनस, सहा लाख रूपये वैद्यकीय बिल, सहा लाख रूपये शिष्यवृत्ती वाटप, जून ते सप्टेंबर २०१६ पर्यंत दोन कोटी पुरवणी वेतन कामगारांना टप्प्याटप्प्याने देण्यात आले. त्यामुळे मजदूर सभा युनियन कामगारांच्या पाठीशी असून मान्यता प्राप्त झाल्यानंतर आतापर्यंत सात वेतन करार केलेले आहे. शिवाय कामगारांना अनेक सोयीसुविधा कंपनीकडून मिळवून दिलेल्या आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
शॉर्टसर्किटने आष्टी पेपरमिलला लागली आग
बीजीपीपीएल व अवंता होर्डींग्ज लिमिटेड पेपरमिलमध्ये १३ मार्च २०१७ ला आग लागली. आग विद्युत अधिनियम २००३ व केंद्रीय प्राधिकरण अधिनियम २०१० अन्वये २० मार्चच्या पत्रकानुसार गडचिरोलीच्या विद्युत निरिक्षकांनी सदर आग ही शॉर्टसर्कीटने लागली, असा खुलासा केला. गडचिरोली जिल्हा कामगार संघाने राजकीय षड्यंत्र रचून विरोधकांनी पेपरमिल व्यवस्थापन व मजदूर सभा युनियन यांनी आग लावल्याचा आरोप केला होता. हे आरोप पूर्णत: बिनबुडाचे आहेत, असा खुलासा यावेळी केला.