डेंग्यू बळीचे प्रकरण अंगलट, डॉक्टर कार्यमुक्त, आरोग्य सहायक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 13:55 IST2025-08-16T13:54:39+5:302025-08-16T13:55:05+5:30
डेंग्यूच्या साथीने घेतले ४ बळी, ९४ रुग्ण पॉझिटिव्ह : अखेर कारवाई सुरू

Dengue victim's case overturned, doctor relieved of duty, health assistant suspended
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील लगाम, येल्ला येथे डेंग्यूचा प्रकोप झाल्याने आठ दिवसांत चौघांचा बळी गेला. सध्या या भागात ९४ रुग्ण डेंग्यूबाधित आहेत. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले. एका कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यास सेवेतून कार्यमुक्त केले असून, दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सुरू केली आहे, यासोबतच दोन आरोग्य सहायकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
लगाम, येल्ला येथे ६ ऑगस्टला पहिला रुग्ण आढळला. मात्र, याची माहिती तेथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच लगाम प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्हा मुख्यालयाला कळविली नाही. त्यामुळे डेंग्यूची साथ पसरली. यातून नंतर लागोपाठ चार मृत्यू झाले, तर तब्बल ९४ रुग्णांचे रक्तचाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळले. यामुळे एकच खळबळ उडाली. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधल्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ सुहास गाडे यांनी १४ ऑगस्ट रोजी लगामचे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार कोल्हे यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. गेडाम यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. यासोबतच मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक अशोक डोंगरवार व लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहायक लिंगाजी नैताम या दोघांना निलंबित केले आहे.
आपापल्या आरोग्य केंद्रांतील गावांमध्ये साथरोग पसरत असताना निष्काळजी केली, तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी याबाबत माहिती होताच गावात धाव घेतली होती, शिवाय चौकशी अहवाल सीईओंकडे सादर केला होता, त्यावरून ही कारवाई करण्यात आली.
सहपालकमंत्री म्हणाले, अहवाल मागविणार
जिल्हा नियोजन समिती बैठकीत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला, त्यास उत्तर देताना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी उपरोक्त कारवाईची माहिती दिली. एकीकडे साथरोग पसरत असताना दुसरीकडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री यांना जिल्हा हिवताप अधिकारीपदाचा पदभार दिला जात होता. याबाबत बैठकीनंतर माध्यमांनी विचारले असता सहपालकमंत्री अॅड. जयस्वाल म्हणाले, या प्रकरणात सविस्तर अहवाल मागविणार असून, कोणाचीही गय करणार नाही.