विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्याची गरज; खासदार अशोक नेतेंचा लोकसभेत अशासकीय ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 04:51 PM2022-04-05T16:51:20+5:302022-04-05T17:09:49+5:30

बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व विदर्भाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी वेगळे विदर्भ राज्य निर्माण करा, अशी मागणी खासदार नेते यांनी लोकसभेत केली.

demand for separate Vidarbha State for development; Unofficial resolution of mp Ashok Nete in Lok Sabha | विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्याची गरज; खासदार अशोक नेतेंचा लोकसभेत अशासकीय ठराव

विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्याची गरज; खासदार अशोक नेतेंचा लोकसभेत अशासकीय ठराव

googlenewsNext

गडचिरोली : वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीशिवाय विदर्भाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकत नाही, या भावनेतून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा अशासकीय ठराव लोकसभेत मांडला. हा ठराव चालू लोकसभेच्या कार्यकाळात कधीही चर्चेला येऊ शकतो, अशी माहिती त्यांच्या वतीने देण्यात आली.

विदर्भात अनेक कामे रखडलेली आहेत. महाराष्ट्र राज्यात नोकर भरती बंद असल्याने लाखो बेरोजगार युवक रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकत आहेत. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या संधी कमी असल्याने बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही. परिणामी या भागातील युवक हताश झाला असून तो वाममार्गाकडे वळलेला आहे. बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व विदर्भाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी वेगळे विदर्भ राज्य निर्माण करा, अशी मागणी खासदार नेते यांनी लोकसभेत केली.

वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने, उपोषणे करण्यात आली. अनेकदा शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र विदर्भ राज्य वेगळे होऊ शकले नाही. त्यामुळे या क्षेत्रातील आदिवासी व ग्रामीण भागाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे व कारखाने कमी प्रमाणात असल्याने युवकांना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे बेरोजगार युवक हताश होऊन वणवण भटकत आहे. वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती झाल्यास विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल व लाखो बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळून ते विकासाच्या प्रवाहात येतील. त्यामुळे केंद्र सरकारने उचित निर्णय घेऊन तातडीने वेगळे विदर्भ राज्य घोषित करावे, अशी मागणी नेते यांनी संसदेच्या सभागृहात अशासकीय ठरावाच्या माध्यमातून केली.

Web Title: demand for separate Vidarbha State for development; Unofficial resolution of mp Ashok Nete in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.