coronavirus: गडचिरोलीत पॉझिटिव्ह आढळलेल्या ठाण्यातील व्यक्तीत कोरोनाचा नवीन स्ट्रेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 19:37 IST2021-03-18T19:34:32+5:302021-03-18T19:37:44+5:30
New strain of coronavirus found in Gadchiroli : ठाणे येथील ती व्यक्ती २५ दिवसांपूर्वी सरकारी कामानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथे आली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांची अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

coronavirus: गडचिरोलीत पॉझिटिव्ह आढळलेल्या ठाण्यातील व्यक्तीत कोरोनाचा नवीन स्ट्रेन
गडचिरोली - मूळच्या ठाणे शहरातील आणि कार्यालयीन कामानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या एका व्यक्तीत कोरोनाचा नवीन स्ट्रेन असल्याचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेने दिला. दरम्यान ती व्यक्ती कोरोनाग्रस्त होऊन आता पूर्णपणे बरीही झाली आहे. एवढेच नाही तर त्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आलेले दोन स्थानिक नागरिकही आता पूर्णपणे बरे झाले आहेत. ठाणे येथील ती व्यक्ती २५ दिवसांपूर्वी सरकारी कामानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथे आली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांची अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना गडचिरोलीतील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या संपर्कातील आलापल्ली येथील दोन व्यक्तीही पॉझिटिव्ह होत्या. ते सर्वजण पूर्ण उपचारानंतर घरीही गेले. (New strain of coronavirus found in Gadchiroli)
दरम्यान आरोग्य विभागाने नेहमीप्रमाणे एकूण पॉझिटिव्ह नमुन्यांपैकी ५ टक्के नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा अहवाल आता आला असून ठाणे येथून आलेल्या त्या व्यक्तीच्या नमुन्यात इंग्लंडमधील कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. आरोग्य विभागाने याला दुजोरा दिला आहे. गडचिरोलीत आढळलेला हा कोरोनाच्या नवीन विषाणूचा पहिलाच रुग्ण होता. गेल्या महिनाभरात गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही हे विशेष.