कंत्राटदाराने तेंदू पुड्याची उचल केलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:14 IST2019-06-22T00:14:26+5:302019-06-22T00:14:54+5:30
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येरमनार ग्रामपंचायतीमध्ये येणाºया येरमनार, गुर्जा खुर्द, मिचगुंडा, कोरेपल्ली व कौठाराम आदी पाच ग्रामसभांनी निर्णय घेऊन करारनामा करून कंत्राटदाराला तेंदू हंगामाचे काम दिले. येथे तेंदूचे संकलन पूर्ण झाले असून मजुरांची चार दिवसांची तेंदू संकलनाची मजुरी शिल्लक आहे.

कंत्राटदाराने तेंदू पुड्याची उचल केलीच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येरमनार ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या येरमनार, गुर्जा खुर्द, मिचगुंडा, कोरेपल्ली व कौठाराम आदी पाच ग्रामसभांनी निर्णय घेऊन करारनामा करून कंत्राटदाराला तेंदू हंगामाचे काम दिले. येथे तेंदूचे संकलन पूर्ण झाले असून मजुरांची चार दिवसांची तेंदू संकलनाची मजुरी शिल्लक आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराने तेंदू बोदची उचलही केली नाही. येत्या दोन दिवसांत कंत्राटदाराने मजुरी न दिल्यास दुसऱ्या कंत्राटदाराला तेंदूपत्त्याचे बोद विकणार, असा इशारा या पाचही ग्रामसभांनी दिला आहे.
यासंदर्भात ग्रामसभांच्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली येथे येऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांच्यापुढे ही समस्या मांडली. यासंदर्भात येरमनारचे सरपंच बी.एस.गावडे, उपसरपंच पी.पी.तलांडी व सचिव एम.एन.हुलके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, सदर पाच ग्रामसभांनी २०१९ च्या तेंदू हंगामाचे काम सावली येथील अमन ट्रेडर्स गोलिबर यांना दिले. ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर व वकिलाच्या नोटरीसह १६ मे रोजी करारनामा केला. लगेच दुसऱ्या दिवशी १७ मे ला तेंदू संकलनाच्या कामास सुरूवात झाली. मात्र संबंधित कंत्राटदाराने कराराची मूळ प्रत ग्रामसभाकडे जमा केली नाही. तेंदू संकलनाची तीन दिवसाची मजुरी दिली. उर्वरित चार दिवसांची मजुरी शिल्लक आहे. याशिवाय पाणी, जमीन, लाईनिंग, पलटाई, झटकाई, बेलकटाई, फळीमुंशी, वाचर, चेकर, बोदभरती, बोदडुलाई आदींची मजुरी दिली नाही.