जि.प.च्या डेप्युटी सीईओवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 18:09 IST2018-05-25T18:09:04+5:302018-05-25T18:09:04+5:30
दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये बसून ग्रामसेवकासोबत दारु पिणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यावर पोलिसांनी दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या 'मुक्तीपथ' संस्थेच्या तक्रारीवरुन आरमोरी पोलिसांनी गुरुवारी रात्री केली.

जि.प.च्या डेप्युटी सीईओवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल
गडचिरोली - दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये बसून ग्रामसेवकासोबत दारु पिणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यावर पोलिसांनी दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या 'मुक्तीपथ' संस्थेच्या तक्रारीवरुन आरमोरी पोलिसांनी गुरुवारी रात्री केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिकराम धनकर व ग्रामसेवक नीलेश जवंजाळकर यांच्यावर मुंबई दारुबंदी कायद्याच्या कलम ६५(ई)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरमोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी(पंचायत)शालिकराम धनकर व ग्रामसेवक नीलेश जवंजाळकर हे गुरुवारी (दि.२४)रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरमोरी येथील भारत भोजनालयात भोजन करीत होते. यावेळी ते ग्लासात लाल रंगाचे द्रव्य ओतून पिताना मुक्तीपथच्या कार्यकर्त्यांना दिसले. त्यांनी ही माहिती 'मुक्तीपथ'चे संचालक डॉ.मयूर गुप्ता यांना दिली. गुप्ता यांनी दूरध्वनीवरुन आरमोरी पोलिसांत तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी भारत भोजनालयात जाऊन चौकशी केली असता धनकर व जवंजाळकर यांच्या ग्लासात लाल रंगाचे द्रव्य आढळून आले. हे द्रव्य दारु असल्याची खात्री पटल्यानंतर दोघांवर रात्री दीड वाजता मुंबई दारुबंदी कायद्याच्या कलम ६५(ई)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांच्याही रक्तांचे नमुने नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाणार आहे. पोलीस उपनिरिक्षक दिलीप मुनघाटे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दारुबंदी कायद्यान्वये उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होण्याची ही मागील काही वर्षांतील पहिलीच घटना असून यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.