कातीच्या कोंबड्यांना चढता भाव
By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:28+5:302015-12-05T09:07:28+5:30
पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात दिवाळीनंतर गावागावांत नाटक व कोंबड बाजाराची धूम सुरू झालेली असते.

कातीच्या कोंबड्यांना चढता भाव
झाडीपट्टीत सर्वत्र धूम : विदर्भाच्या अनेक जिल्ह्यातून खरेदीदार दाखल
देसाईगंज : पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात दिवाळीनंतर गावागावांत नाटक व कोंबड बाजाराची धूम सुरू झालेली असते. यंदाही जागोजागी नाटक व कोंबड बाजार भरविले जात आहे. मात्र कोंबडबाजारात कातीचा कोंबडा खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदीदार येत असल्याने चढता भाव मिळत आहे.
दिवाळी संपल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यासह पूर्व विदर्भात आदिवासी व ग्रामीण बांधव कोंबड्याच्या झुंजी मनोरंजनासाठी लावतात. या खेळाला सध्या परिस्थितीत जुगाराचे स्वरूप आले असले तरी पूर्व विदर्भातील या झुंजी पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक दाखल होत असतात. मोठी आर्थिक उलाढाल यातून होते. आदिवासींचा पूर्वापार चालत आलेला हा मनोरंजनाचा खेळ आता मोठे आर्थिक केंद्र बनला आहे. येथे झुंजीसाठी सावज, बेरड, गावठी अशा विविध जातीच्या जातिवंत कोंबड्या तयार केल्या जातात. या कोंबड्यांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तुपासारखे पौष्टिक पदार्थ खायला दिले जातात. त्यानंतर कसलेला हा कोंबडा झुंजीमध्ये लढविला जातो. सध्या परिस्थितीत कोंबड्याला उत्तेजनात्मक इंजेक्शनही लावले जाते. झुंजीसाठी कोंबड्याच्या पायांना लोखंडी धारदार चंद्राती शस्त्र (काती) वेगवेगळ्या रसायनात विषयुक्त पाण्यात भिजवून बांधले जाते. या कातीच्या मारामुळे रक्तबंबाळ झालेला कोंबडा जास्त वेळ तग धरून राहिला पाहिजे. यासाठी कोंबडा मालकाचा खटाटोप दिसून येतो. या आदिवासी मनोरंजनाच्या खेळात मोठ्या प्रमावर कोंबड्यांवर पैसेही लावले जात आहे. विदर्भाच्या अनेक भागातून चारचाकी वाहनांची गर्दी ही कोंबड्यांची लढाई पाहण्यासाठी जमते. या लढाईत हरलेला व जिंकलेला कातीचा कोंबडा खरेदी करण्यासाठीही चढाओढ सध्या दिसून येत आहे. एक हजार रूपयापर्यंत हा कोंबडा खरेदी केला जातो. ३०० रूपयांचा हा कोंबडा हजार रूपयापेक्षाही जास्त किमतीचा ठरत आहे. यामागे खरेदीदारांची गर्दी हेच प्रमुख कारण आहे. (वार्ताहर)
कोंबड्यासाठी केली जाते क्रौर्याची परीसीमा
झुंजीसाठी कोंबड्यांना तयार करण्याकरिता पहाटेलाच तलावावर आंघोळ घातली जाते. वेळप्रसंगी कोंबड्यांना रात्रभर थंडीत बाहेर ठेवले जाते. कोंबडा क्रूर होण्यासाठी वेगवेगळ्या उपायांचा अवलंब केला जातो. या मेहनतीमागे कोंबडा शूर शिपायाप्रमाणे लढला पाहिजे हा क्रूर हेतू असतो. कायद्याने या लढतीवर बंधन असले तरी मनोरंजनाच्या नावावर मात्र झाडीपट्टीत सर्रास हा प्रकार सुरू आहे.