गडचिरोलीत कॉपी प्रकाराबाबत केंद्र संचालकांसह चार जणांवर गुन्हे दाखल; सीईओंच्या भेटीत प्रकार उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 19:49 IST2026-02-21T19:49:13+5:302026-02-21T19:49:57+5:30
Gadchiroli : चामाेर्शीे येथील जा. कृ. बोमनवार विद्यालयाच्या केद्रांवर काॅपीचा सदर प्रकार आढळून आल्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने सखाेल चाैकशी करण्यात आली.

Cases registered against four people including the center director regarding copying in Gadchiroli; The incident was revealed during the CEO's meeting
गडचिराेली : बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे फाेटाे काढून चाटजीपीटीच्या माध्यमातून उत्तरे शाेधून काॅपी केल्याचा प्रकार चामोर्शी तालुक्यातील जा. कृ. बोमनवार विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, (केंद्र क्र. ०६१५) येथे उघडकीस आला असून याप्रकरणी संबधित केद्राच्या संचालकांसह चार जणांवर २० फेब्रुवारी राेजी रात्री उशीरा चामाेर्शी पाेलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
महेंद्र वसंतराव बुर्लावार, सहायक शिक्षक तथा केद्रसंचालक, शिक्षक तथा पर्यवेक्षक सुशील रामचंद्र लांजेवार, शिक्षक महेंद्र बाबुराव किरमे व शिपाई सूरज प्रमाेद केळझरकर या चाैघांवर परीक्षेमध्ये हाेणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याचा अधिनियम १९८२ नूसार चामाेर्शी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकाराबाबत चामाेर्शीचे गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांनी पाेलिसात फिर्याद दाखल केली. दरम्यान काॅपीचा हा प्रकार १८ फेब्रुवारी राेजी सायंकाळी ४. ५० वाजताच्या सुमारास उघडकीस आला. सकाळी रसायनशास्त्र व दुपारी ३ ते ५ या वेळेत राज्यशास्त्र विषयाचा पेपर सुरू हाेता. दरम्यान जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सदर केंद्राला आकस्मिक भेट दिली. यावेळी सदर प्रकार उजेडात आला.
केंद्रसंचालकांसह पर्यवेक्षकही बदलविले
चामाेर्शीे येथील जा. कृ. बोमनवार विद्यालयाच्या केद्रांवर काॅपीचा सदर प्रकार आढळून आल्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने सखाेल चाैकशी करण्यात आली. दरम्यान सदर केद्रावरचे केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व कर्तव्यावरील सर्व कर्मचारी बदलविण्यात आले आहे. या केद्रांवर ज्या शाळांचे विद्यार्थी आहेत, त्या शाळेव्यतिरिक्त इतर शाळांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे,अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भूसे यांनी ‘लाेकमत’ शी बाेलताना दिली.
निलंबनाचा प्रस्ताव तयार
सदर प्रकरणातील तीन शिक्षक व एक शिपाई अशा एकूण चारही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याला शनिवारी सायंकाळी उशिरा मंजुरी देण्यात आल्याची माहीती शिक्षण विभागाच्या सुत्रांकडून मिळाली.