पैसेही असू शकतात बेवारस? गडचिरोलीतील बँकांच्या ४० हजार खात्यांमध्ये आठ कोटींची रक्कम पडून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 19:53 IST2025-10-18T19:52:47+5:302025-10-18T19:53:21+5:30
केवायसी करून परत मिळवा रक्कम : संबंधित बँकांशी साधा संपर्क

Can money also be unclaimed? Eight crores of money lying in 40,000 bank accounts in Gadchiroli
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, सलग १० वर्षांपासून कोणतेही व्यवहार न झालेल्या खात्यातील ठेवी 'ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधी' या निधीत हस्तांतरित केल्या जातात. मात्र, खातेदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेत संपर्क साधून अद्ययावत केवायसीसह आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक प्रशांत धोंगळे यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील विविध बँकांमधील ४० हजार ४९१ खात्यांमध्ये तब्बल ७ कोटी ७० लाख रुपयांच्या ठेवी दावा न करता पडून आहेत. यामध्ये शासकीय २७९ खात्यांमध्ये ९३ लाख ५० हजार रुपये, संस्थांच्या १२ हजार १५६ खात्यांमध्ये ३ कोटी २२ लाख आणि वैयक्तिक २८ हजार ५६ बँक खात्यांमध्ये ३ कोटी ५५ लाख रुपयांचा समावेश आहे. देशभरात अशा निष्क्रिय ठेवींची रक्कम तब्बल १ लाख ३५ हजार कोटी रुपये इतकी असून, केवळ महाराष्ट्र राज्यात सुमारे ५ हजार ८६६ कोटी रुपयांच्या ठेवी निष्क्रिय आहेत.'
'उद्गम' पोर्टलवर रक्कम शोधण्याची सुविधा
'उद्गम' पोर्टल हे नागरिकांना त्यांच्या बेवारस ठेवींची माहिती एकाच ठिकाणी शोधता येईल यासाठी बनविण्यात आले आहे. पोर्टलवर रक्कम शोधण्याची सुविधा आहे. आरबीआयने सुरू केलेल्या या विशेष मोहिमेचा उद्देश नागरिकांना त्यांच्या विसरलेल्या, अनक्लेम्ड ठेवींची माहिती मिळवून देणे आणि त्या रकमेवर वैध दावा सादर करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे वारसदारांना मोहिमेचा लाभ घेण्याची संधी आहे. ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेशी 3 संपर्क साधल्यास तेथील कर्मचारी केवायसीबाबतची माहिती देऊ शकतात.
हवीत ही कागदपत्रे ?
आधारकार्ड किंवा पॅनकार्ड, बँक पासबुक किंवा खात्याचा पुरावा, मृत्यू प्रमाणपत्र, नातेसंबंध सिद्ध करणारा पुरावा, अर्जाचे फॉर्म व स्वहस्ताक्षरीत घोषणापत्र आदी कागदपत्रे तसेच पुरावे बँकेला सादर करावे लागतात. शासनाने याबाबतचा स्वतंत्र उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांची रक्कम परत मिळणार आहे.
१० वर्षे जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती सुरू
१० वर्षे पेक्षा अधिक कालावधीत बँकेचे कोणतेही व्यवहार झाले नसल्यास सदर खाते निष्क्रिय म्हणून घोषित केले जाते. अशा खात्यावरील पैसे मिळविण्यासाठी केवासयी करावी लागते.
२७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम
या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बँकांच्या माध्यमातून १३ ते १७ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व बँक शाखांमध्ये जनजागृती शिबिरे, ग्राहक भेटी व सल्ला शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. तसेच २७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध बँकांची माहिती व दावा केंद्र सुरू राहणार आहेत.
"ही योजना म्हणजे खातेदारांसाठी स्वतःचे पैसे परत मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. प्रत्येक खातेदाराने आपल्या बँकेशी संपर्क साधून केवायसी कागदपत्रे अद्ययावत करावीत. आवश्यक दावा अर्ज सादर करावा."
- प्रशांत धोंगळे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, गडचिरोली