सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची शिक्षकपदी नियुक्ती करून बेरोजगारांच्या आशेवर फेरले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 14:51 IST2024-08-22T14:46:44+5:302024-08-22T14:51:32+5:30
पात्रताधारकांमध्ये रोष : सुशिक्षितांना संधी देण्याची मागणी

By appointing retired employees as teachers, the hopes of the unemployed have been dashed
प्रदीप बोडणे
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. या पदासाठी पात्र उमेदवार आहेत. असे असतानाही पेसा क्षेत्रात शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सुशिक्षित बेरोजगारांऐवजी सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना डावलून सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती का केली जात आहे, असा सवाल सुशिक्षित बेरोजगारांचा आहे.
जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शिक्षण भरतीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने सरकारला पात्र उमेदवारांची शिक्षक भरती करता येत नाही. यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या वतीने १५ जुलै २०२४ रोजी आदेश काढून त्यात पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे सेवानिवृत्त शिक्षकांमधून करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
पेसा क्षेत्रातील सर्व पंचायत समितीअंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. संबंधित सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्तीपत्रही पाठविलेले आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांना आधीच ३० ते ४० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते. सर्व शिक्षकांचे वय ६० वर्षांहून अधिक आहे. त्यांच्याकडून आता अध्यापनाचे कार्य उत्तम प्रकारे होईल काय, असा सवाल सुशिक्षित बेरोजगारांचा आहे. सुशिक्षितांकडून अर्ज मागविले जात असले तरी नियुक्ती केव्हा होणार, असा प्रश्नही आहे.
सुशिक्षित बेरोजगार म्हणतात....
"पेसा क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांची भरती प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्याने तात्पुरत्या स्वरुपात सेवानिवृत्ती शिक्षकांची नियुक्ती म्हणजे पोट भरलेल्या लोकांना पुन्हा अन्न वाढण्यासारखे आहे. याच कारणामुळे बेरोजगारीची संख्या वाढत आहे."
- पुनीत बावनकर, वैरागड
"जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड असताना बेरोजगार तरुणांना रोजगार न देता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करणे म्हणजे बेरोजगारांवर अन्याय आहे. अटी शिथिल करून सुशिक्षितांना संधी द्यावी."
- ज्योत्स्ना बोडणे, वैरागड
"सेवानिवृत्त शिक्षकांना आधीच निवृत्तीवेतन मिळत असताना पुन्हा मानधन करणे चुकीचे देऊन नियुक्त्ती आहे. सेवानिवृत्त शिक्षक सेवाभाव ठेवून विद्यादानाचे काम मोफत करत असतील तर आमची काही अडचण नाही."
- अंकित बोधनकर, वैरागड
"सेवानिवृत्त शिक्षकांना तालुक्यापासून २० ते ३० किलोमीटर अंतरावरील गावांत नियुक्त केले तर ये-जा करू शकत नाही. सेवानिवृत्त काही शिक्षकांना आजार असतात. त्यामुळे ते कुटुंबापासून दूर राहू शकत नाहीत."
- चंदू उंदीरवाडे, वैरागड