भावाने तलवारीने सपासप वार करत केली बहिणीची हत्या ! आई जीव वाचवण्यासाठी घुसली शेजाऱ्याच्या घरात; चंद्रपुरातील रक्तरंजित घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:40 IST2026-02-25T15:17:01+5:302026-02-25T16:40:07+5:30
Chandrapur : घरगुती वादातून भद्रावतीत रक्तरंजित घटना; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Brother kills sister by stabbing her repeatedly with a sword! Mother enters neighbor's house to save her life; Bloody incident in Chandrapur
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती (चंद्रपूर) : शहरातील झिंगुजी वॉर्ड परिसरात घरगुती वादाने रौद्ररूप धारण करीत सख्ख्या भावाने बहिणीची तलवारीने हत्या केली, तर आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२४ फेब्रुवारी) रात्री सुमारे ०८:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत संजीवनी शंकर भोंडे (३०) हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिची आई पुष्पा शंकर भोंडे (५५) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सूरज शंकर भोंडे (२८) याने घरातील तलवारीने बहिणीच्या मानेवर सपासप वार करून तिची निर्दयीपणे हत्या केली. त्यानंतर आईचा पाठलाग करीत तिच्या कानावर व हातावर वार केले. जखमी अवस्थेत पुष्पा भोंडे यांनी शेजाऱ्यांच्या घरात धाव घेतल्याने त्यांचा प्राण वाचला. कौटुंबिक कारणांवरून गेल्या काही दिवसांपासून घरात वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. आरोपी सूरज व त्याचे वडील शंकर हे वेगळा स्वयंपाक करीत होते, तर माय-लेकी वेगळा स्वयंपाक करीत होत्या. जेवणाच्या कारणावरून आणि घरगुती कामांवरून वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. माय-लेकी शेतमजुरीस जात असल्यामुळेही तणाव वाढत होता.
घटनेच्या दिवशी काय घडले?
घटनेच्या दिवशी सूरज भोंडे हा बाजारातून भाजीपाला घेऊन आला असता तो बहिणीने हिसकावून घेतला. या कारणावरून वाद चिघळला. संतापाच्या भरात सूरजने तलवार उचलून बहिणीवर जीवघेणे वार केले.
या वादासंदर्भात यापूर्वीही पोलिसांत तक्रारी झाल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीस ताब्यात घेतले. पुढील तपास ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या रक्तरंजित घटनेची शहरभर चर्चा सुरू असून झिंगुजी वॉर्ड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.