दारूबंदीसाठी आमदारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:23 IST2018-04-25T00:23:14+5:302018-04-25T00:23:14+5:30
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी देसाईगंज शहरातील प्रत्येक वॉर्डात बिनबोभाटपणे दारूविक्री केली जात आहे. दारू बंद करावी, यासाठी महिलांनी आ. कृष्णा गजबे यांना गाठून निवेदन सादर केले.

दारूबंदीसाठी आमदारांना साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी देसाईगंज शहरातील प्रत्येक वॉर्डात बिनबोभाटपणे दारूविक्री केली जात आहे. दारू बंद करावी, यासाठी महिलांनी आ. कृष्णा गजबे यांना गाठून निवेदन सादर केले.
गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी कायदा लागू असला तरी जिल्ह्यातील अपवाद वगळता प्रत्येक गावात दारू उपलब्ध आहे. दामदुपटीने दारू विकली जात असल्याने दारूविक्रेते गर्भश्रीमंत बनत चालले आहेत. मात्र यामुळे अनेकांचे कुटुंब लयास जात आहेत. गावातील शांतता धोक्यात आली आहे. दारूविक्री सुरू आहे, याची माहिती पोलिसांना असली तरी पोलीस मात्र दारूविक्रेत्यांवर कोणतीच कारवाई करीत नाही. जे नागरिक व महिला दारूविक्रेत्यांच्या विरोधात तक्रारी करतात, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश पोलीस विभागाला द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी महिलांशी चर्चा करताना आ. गजबे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून दारूबंदीची मोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले जातील, असे आश्वासन दिले.