निराधार योजनांमध्ये मोठी कारवाई! गडचिरोलीत मयत लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:37 IST2025-08-07T16:32:49+5:302025-08-07T16:37:33+5:30
मोहीम : गावागावांत यादीचे वाचन, आधी केंद्र सरकार नंतर राज्य सरकारच्या योजनांची तपासणी

Big action in schemes! Names of deceased beneficiaries in Gadchiroli to be removed from the list
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एकल महिला, वृद्ध, दिव्यांग तसेच देवदासी, परित्यक्तांचे जीवनमान सुसह्य व्हावे यासाठी शासनाच्या वतीने संजय गांधी योजनेंतर्गत मासिक अर्थसाहाय्य दिले जाते. मात्र, अनेकदा लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतरही लाभ देणे सुरूच असते. जिल्ह्यात सध्या संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. गावांमध्ये निराधारांच्या यादीचे वाचन करून मयत लाभार्थ्यांचे नाव वगळण्याची कार्यवाही सुरू आहे.
वृद्ध, विधवा, परित्यक्तांसह देवदासी, दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभ दिला जातो. १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपयांपर्यंत हा लाभ लाभार्थ्यांच्या स्थितीनुसार दिला जातो.
निराधारांच्या योजना
राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. याशिवाय केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजना, राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना आदी योजना आहेत.
निराधार योजनेचे लाभार्थी
तालुका लाभार्थी संख्या
अहेरी १३,८९०
आरमोरी ८,३६३
भामरागड २,७९६
चामोर्शी १८,४७२
देसाईगंज ९,१०६
धानोरा ४,३८३
एटापल्ली ४,५५६
गडचिरोली ७,२७८
कोरची ३,४९५
कुरखेडा ७,१७६
मुलचेरा ४,३१२
सिरोंचा ११,३२२
यादी होणार अद्ययावत
निराधारांना जे मासिक अर्थसाहाय्य दिले जाते. त्यात केंद्र शासनाचा हिस्सा असतो. काही योजना केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहेत. सदर योजनांच्या लाभासाठी बेनिफिशरी सत्यापन केले जाणार आहे. याकरिता आधार 'फेस आरडी' अॅप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांची ओळख पडताळणी केली जाईल.