भामरागड हादरले, माजी पंचायत समिती सभातीची नक्षल्यांकडून हत्या, मृतदेहाजवळ टाकले पत्रक

By संजय तिपाले | Updated: February 2, 2025 12:32 IST2025-02-02T12:31:58+5:302025-02-02T12:32:34+5:30

पेनगुंडात पोलिस मदत केंद्र स्थापन करण्यास मदत केल्याचा आरोप...

Bhamragad shaken, former Panchayat Samiti Sabhati killed by Naxalites | भामरागड हादरले, माजी पंचायत समिती सभातीची नक्षल्यांकडून हत्या, मृतदेहाजवळ टाकले पत्रक

भामरागड हादरले, माजी पंचायत समिती सभातीची नक्षल्यांकडून हत्या, मृतदेहाजवळ टाकले पत्रक



गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील पेनगुंडा व पाठोपाठ नेलगुंडा येथे पोलिस मदत केंद्र स्थापन केल्याने बिथरलेल्या नक्षल्यांनी कियेर (ता. भामरागड) येथील माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी (४५) यांची हत्या केली. २ फेब्रुवारीला सकाळी गावालगत मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ नक्षल्यांनी एक पत्रक टाकले. त्यात मृत व्यक्तीने पेनगुंडा येथे पोलिस मदत केंद्र उघडण्यासाठी पोलिसांना मदत केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली.

अतिदुर्गम भागाती नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या परिसरात त्यांच्या नाकावर टिच्चून पोलिसांनी अवघ्या एका दिवसात पोलिस मदत केंद्र उभारण्याची किमया केली. डिसेंबर महिन्यात पेनगुंडा गावाजवळ पोलिस मदत केंद्र सुरु करण्यात आले. त्यानंतर नेलगुंडा येथे ३० जानेवारीला पोलिस मदत केंद्र उघडण्यात आले. यामुळे छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात सहज प्रवेश करणाऱ्या माओवाद्यांची नाकाबंदी झाली होती. नक्षल्यांच्या प्रभाव क्षेत्रात पोलिसांची सुरक्षा व्यवस्था मजबूत होत असल्याने हिंसक चळवळीला मोठा धक्का बसला होता. 

दरम्यान, १ फेब्रुवारीला रात्री तीन नक्षल्यांनी कियेर गावातून माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी यांना उचलले व जंगलात नेले. तेथे त्यांची गळा दाबून हत्या केली. मृतदेहाजवळ टाकलेल्या पत्रकात सुखराम मडावी हे पोलिसांचे खबरी असल्याचा दावा केला आहे.

कंपनी क्र. १० वर संशय 
दरम्यान, भामरागड परिसरात माओवाद्यांच्या कंपनी क्र. सध्या ८ जण सक्रिय आहेत. त्यातील तिघांनी हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तथापि, या भागात गेल्या काही वर्षांत पोलिसांनी नक्षल्यांविरोधात धडक कारवाया केल्या, त्यात जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले तर काहींनी आत्मसमर्पण केले. 

मृत व्यक्ती पोलिसांचा खबरी नव्हता. मृतदेहाजवळ सापडलेल्या पत्रकावरून तपास सुरू केला आहे. परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले आहे.
नीलोत्पल, पोलिस अधीक्षक

Web Title: Bhamragad shaken, former Panchayat Samiti Sabhati killed by Naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.