जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करुन गडचिरोलीत बदल्या, नियुक्त्या होत आहेत का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:05 IST2025-08-13T18:04:29+5:302025-08-13T18:05:00+5:30
प्रतिनियुक्त्यांची चौकशी करावी : योगाजी कुडवे

Are transfers and appointments being made in Gadchiroli by misleading the District Collector?
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वादग्रस्त तहसीलदार संतोष आष्टीकर यांच्या बदलीनंतर रिक्त जागेचा पदभार लाचखोरीचा गुन्हा नोंद असलेल्या आस्थापना विभागातील तहसीलदार सचिन जैस्वाल यांना दिला होता. यासंदर्भात ओरड होताच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी ११ ऑगस्ट रोजी तातडीने पदभार काढून घेत आरमोरीच्या तहसीलदारांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला. मात्र, यामुळे बदल्या, नियुक्त्यांत जिल्हाधिकाऱ्यांची कोण दिशाभूल करतयं, याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरु आहे.
संतोष आष्टीकर व सचिन जैस्वाल हे एकाच जिल्ह्यातील असून एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दालनात जैस्वाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करुन जिल्हाधिकारी पंडा यांच्याकडे पदभार सोपविण्याची संचिका पाठविण्यात आली, अशी खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे.
माफिया झाले सक्रिय ?
शेतीच्या नावाखाली रेतीघाटाला संरक्षण मिळविण्यासाठी मर्जीतील अधिकारी खुर्चीत बसविण्याकरता काही माफिया सक्रिय झाल्या आहेत. सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे नाव सांगून ते दबावतंत्र वापरत असल्याची चर्चा आहे.
प्रतिनियुक्त्यांची चौकशी करावी : योगाजी कुडवे
दरम्यान, महसूल विभागात विशिष्ट कर्मचाऱ्यांची चलती असून ते वाळूमाफिया आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीने सोयीनुसार बदल्या, प्रतिनियुक्त्या पदरात पाडून घेत आहेत. मात्र, काही अधिकारी, कर्मचारी वर्षानुवर्षे निमूटपणे दुर्गम भागात सेवा देत आहेत. या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या, बदल्यांची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी केली आहे.